कोल्हापूर : पोलिस असल्याचा बहाणा करून लुटमार करणारी हुपरी परिसरातील टोळी जेरबंद

Last Updated: May 23 2020 7:04PM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊनच्या काळात पोलिस असल्याचा बहाणा करून निर्जन मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीसह मोटारींना वाटेत रोखून लुटमार करणाऱ्या हुपरी परिसरातील टोळीला करवीर पोलिसांनी शनिवारी (ता.२३) पहाटे बेड्या ठोकल्या. टोळीचा म्होरक्या शितल विजय वडगावकर कांबळे (रा. शाहू नगर हुपरी,) अण्णा आनंद शिंदे (वय ३२, रा. रेंदाळ ता. हातकणंगले) विकास सुरेश शिंदे (वय ३५, रा. तळंदगे फाटा, इंगळे ता. हातकणंगले)  अशी संशयितांची नावे आहेत.

वाचा :कोल्हापुरात कोरोना उद्रेक सुरुच; आणखी १४ कोरोनाग्रस्त

यापैकी शितल वडगावकर कांबळेकडे हुपरी नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन समितीचा स्वयंसेवक कार्यकर्ता असल्याचे ओळखपत्र सापडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपली आपत्ती व्यवस्थापनावर निवड झाल्याचे तसेच ठिकाणी नियुक्त झालेल्या नाकाबंदी पॉईंटवर आपणाला वाहन तपासणीचे आणि कारवाईचे अधिकार देण्यात आल्याचे भासवून ही टोळी रात्री-अपरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची तसेच ई- पासची मागणी करत होते. कागदपत्रे नसल्यास मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व अन्य वस्तू हिसकावून घेत असत. गेल्या पंधरा दिवसांपासून करवीर तालुक्यात या टोळीने धुमाकूळ घातला होता. चार दिवसांपूर्वी तालुक्यातील हळदी, इस्पूर्ली याठिकाणी वाटमारीचे प्रकार घडले होते.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी तक्रारी केली. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक निरीक्षक अरविंद कांबळे, डीबी पथकाचे प्रशांत माने व टीमने दोन दिवस या परिसरात मध्यरात्री हळदी येथे ही टोळी पोलिसांच्या हाताला लागली आहे. प्राथमिक चौकशीत दहा ते बारा वाटमारीच्या घटना उघड केल्या आहेत. टोळीतील आणखी दोघेजण पसार झाले आहेत. त्यांचाही लवकर छडा लागेल असे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

वाचा :कोल्हापूर : चित्री मध्यम प्रकल्पाची चारही आवर्तने पूर्ण