Fri, Apr 19, 2019 12:20होमपेज › Kolhapur › फेकून दिलेले प्लास्टिक आपल्याच मुळावर

फेकून दिलेले प्लास्टिक आपल्याच मुळावर

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कचर्‍याकडे आपण केलेले दुर्लक्ष आपल्याच मुळावर येते. वाढणार्‍या कचर्‍याची समस्या ही जगाला भेडसावत आहे. प्लास्टिकाचा अतिवापर हा मानवी आरोग्यास घातक ठरत असून वायू, जल व माती प्रदूषण यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वेल्लोरस्थित मे. इंडियन ग्रीन सर्व्हिसचे श्री श्रीनिवासन यांनी केले.

कोल्हापूर महापालिकेतर्फे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, खासगी संस्था यांच्यासाठी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर त्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात केले आहे. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी होते. यावेळी महापौर स्वाती यवलुजे यांनी प्रत्येक नगरसेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा व आपला प्रभाग कसा स्वच्छ राहील,  यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी श्री श्रीनिवासन यांनी अंबिकापूर (छत्तीसगड) येथे चाळीस वर्षांच्या साठलेल्या कचर्‍याचे केलेले व्यवस्थापन चित्रफितीद्वारे दाखविले. तसेच गुरे, पक्षी व मानव यांच्या जीवनाला प्लास्टिक कसे घातक आहे, ओल्या व सुक्या कचर्‍याचे विलगीकरण याची चित्रफितीतून माहिती दिली. श्री श्रीनिवासन पुढे म्हणाले, ‘प्लास्टिक कॅरीबॅगचा कचरा सर्व प्रकारच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यापासून संसाधन निर्मिती होऊ शकते. यामध्ये लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था, बचत गट यांनी यामध्ये योगदान दिल्यास कचर्‍याच्या समस्येचा निपटारा होऊ शकतो. चांगले खत, प्लास्टिकचा पुनर्वापर यासाठी कचर्‍याचे विलगीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. 

याप्रसंगी उपमहापौर सुनील पाटील, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, नगरसेवक भूपाल शेटे, अफजल पिरजादे, सचिन पाटील, नगरसेविका रूपाराणी निकम, सुरमंजिरी लाटकर, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.