होमपेज › Kolhapur › प्लास्टिक बंदी : कुरुंदवाड नगरपरिषदेचा दणका, २५ हजार दंड वसूल

प्लास्टिक बंदी : कुरुंदवाड नगरपरिषदेचा दणका, २५ हजार दंड वसूल

Published On: Jun 25 2018 6:50PM | Last Updated: Jun 25 2018 6:50PMकुरुंदवाड: प्रतिनिधी

येथील पालिकेने महाराष्ट्र राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा घेतलेल्या निर्णयानुसार आज सोमवार सायंकाळी बाजारपेठेतील काही दुकानात धाडी टाकण्यात आल्या. या धाडीमध्ये एक टनाहून अधिक प्लास्टिक जप्त करत या कारवाईतून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर पालिकेने धाडी टाकल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरताच. काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून प्लास्टिक आणून पालिकेत जमा केले आहे. या कारवाईने शहरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणालले आहेत. 

दरम्यान पालिकेने प्लास्टिक जप्ती मोहीम सुरू केल्यानंतर व्यापारीअसोसिएशनच्या पदाधिकारी व व्यापार्‍यांनी  मुख्याधिकारी मुतकेकर यांच्याकडे धाव घेऊन व्यापार्‍यांच्याकडे सध्या प्लास्टिक पॅकिंगमध्ये असलेल्या वस्तू विक्री करून येणारा नवीन माल बिगर प्लास्टिकचा खरेदी करु त्यासाठी १५ मुदत द्यावी अशी मागणी केली, मात्र मुख्याधिकारी मुतकेकर यांनी शासनाने २२ जूनपर्यंत तीन महिन्याची मुदत दिली होती. हा निर्णय आमचा नसून शासनाच्या आदेशानुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले.

शहरातील भाग्यश्री ब्युटी स्टोअर्स, जनता कटलरी, करिश्मा ब्युटी स्टोअर्स, जगदंबा कलेक्शन, अभिनंदन किराणा स्टोअर्स यांच्या दुकानांवर धाडी टाकून एक टणाहून अधिक प्लास्टिक जप्त करून हे प्लास्टिक नष्ट करण्यात आले.प्रत्येक दुकानदाराला पाच हजार रुपये प्रमाणे २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला 

या पथकात आरोग्य लिपिक स्नेहल पन्हाळकर, कर निरीक्षक नंदकुमार चौधरी, आस्थापना लिपिक अजित दीपंकर , दुकान भाडे निरीक्षक अमोल कांबळे आदी उपस्थित होते.