कोल्हापूर : प्रतिनिधी
पेट्रोलचे दर शंभरी गाठताहेत की काय? अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रतिलिटर 70 रुपयांपेक्षा कमी असणारा दर सध्या 79 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असल्याने ग्राहकांच्या निदर्शनास ही बाब आली नव्हती; पण आता ग्राहक जागरूक झाल्याचे चित्र आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे.
सहा महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर महिन्याच्या 15 आणि 30-31 तारखेला जाहीर होत असत. पंधरा दिवसांतून इंधनाची दरसूची जाहीर होत राहिल्याने ग्राहकांच्या निदर्शनास ही बाब चटकन येत होती. अलीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोजच बदलत आहेत. त्यामुळे दरवाढीकडे फारसे लक्ष जात नसल्याची स्थिती होती. गेल्या आठवडाभरात तर पेट्रोलचे दर खूपच तेजीत आहेत. आठवडाभरात चार रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत. ही अचानक सुरू असलेली वाढ सर्वसामान्य दुचाकीचालकांच्या खिशाला झळ पोहोचवत आहे.
सध्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल विक्रेत्यांना बदललेल्या दराची माहिती मिळते. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून नव्या दराची अंमलबजावणी सुरू होते. विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांनी जाहीर होणार्या दरसूचीमुळे इंधनाचे दर कमी किंवा जास्त झालेले चटकन कळत असत. अलीकडे दररोजच दरसूची बदलत असल्याने त्याकडे फारसे कोणाचे लक्ष नाही; पण गेल्या आठवडाभरात विशेषतः पेट्रोलची दरवाढ गतीने सुरू असल्याने ग्राहक चौकशी करू लागले आहेत. दररोज किमान 20 ते 40 पैशांनी प्रतिलिटरमागे दरवाढ सुरू आहे. शनिवारी (दि. 13) कोल्हापुरात पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर 78 रुपये 79 पैसे होता. म्हणजेच एक लिटर पेट्रोल भरायचे झाल्यास 79 किंवा 80 रुपये काही ठिकाणी आकारले जात होते.
सुट्या पैशांचे कारण असल्याने काही ग्राहक थेट 100 रुपयांचे पेट्रोल भरतात; पण त्यातही त्यांना भुर्दंड सहन करावा लागतो. शंभर रुपयांचे पेट्रोल भरले असता ते प्रत्यक्षात 99 रुपये 52 पैशांचेच सोडले जाते. ग्राहकांना येथे 48 पैशांचा तोटा सहन करावा लागत असल्याने त्याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.