Fri, Apr 26, 2019 17:35होमपेज › Kolhapur › पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतन द्या

पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतन द्या

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:52PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी लाल बावटा पेट्रोल पंप कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जमावबंदी असल्याने मोर्चा रद्द करून निदर्शने करण्यात आली. मागण्यांचा विचार न केल्यास एक दिवस पेट्रोल पंपावर काम बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

कामगारांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार गुरू बिराजदार  यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, देशात 56 हजार पेट्रोल पंप आहेत. यामध्ये 9 लाख कामगार काम करत आहेत. केंद्र सरकारने 1 ऑगस्ट 2017 रोजी या कामगारांसाठी नवीन वेतन घोषित करून कामगारांचे पगार बँकेमार्फत करण्याचे आदेश दिले; पण अजूनही या नवीन वेतनाची अंमलबजावणी झाली नाही.
नवीन वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी  पेट्रोल पंप मालकांकडे मागणी करण्यात आली; पण त्याची दखल घेतली गेली नाही. तसेच कामगारांना ई एसआय योजना, प्रॉव्हिटंड फंड लागू करावा, याबाबतही निवेदन देण्यात आले आहे.

घटनेच्या वतीने सनदशीर मार्गाने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करण्यात येत आहे. सहायक कामगार आयुक्‍त यांना निवेदन देण्यात आले. किमान वेतनाप्रमाणे पगार, रजेचा पगार, बोनस व बँकांमार्फत पगार व्हावेत, अशी मागणी करण्यात आली; पण त्याचीही अंमलबजावणी पेट्रोल पंपचालकांनी केली नाही. त्यामुळे पंपावरील कामगारांना आठ तास काम मिळाले पाहिजे, ऑगस्ट पूर्वीचा व पुढचा पगाराचा फरक मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या.  

दरम्यान, दसरा चौक येथे लाल बावटा संघटनेचे कॉ. भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव यांची भाषणे झाली. या आंदोलनात मधुकर येवलूजे, कॉ. इम्रान जंगले, संजय यादव, अमित चौगुले, सरदार पाटील, संदीप सुतार व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.