Fri, Jan 18, 2019 09:46होमपेज › Kolhapur › कधी थांबणार ही महागाई?

कधी थांबणार ही महागाई?

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:27AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

पेट्रोल व डिझेलच्या दरांत सतत होणार्‍या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या महिन्याभरात पेट्रोलच्या दरात दोन रुपये, तर डिझेलमध्ये चार रुपयांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईही अप्रत्यक्षपणे वाढत असून, पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करावा, ही मागणी  होत आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम पदार्थांच्या दरात होणार्‍या बदलांप्रमाणे भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरांत दररोज बदल होतात. पूर्वी दर पंधरा दिवसांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत बदल केले जात होते. हे बदल पंधरा दिवस स्थिर राहात होते. त्यामुळे ग्राहकांना पंधरा दिवसांपुरता तरी दरांबाबत दिलासा मिळत होता. या दरांत अचानक बदल करता येत नव्हते; पण आता दररोज काही पैशांत दर बदलत असल्यामुळे ग्राहकांना या किरकोळ बदलांची फारशी तीव्रता जाणवत नाही. महाराष्ट्रात कर्नाटक व गोव्याच्या तुलनेत सर्वाधिक पेट्रोल व डिझेलचे दर आहेत. सीमाभागातील पेट्रोल पंपांना या दरांचा फटका बसत आहे. 

जीएसटी लागू करताना केेंद्र सरकारने राज्याने इंधनावरील प्रवेश कर रद्द करावेत, असे आदेश दिले होते. कर्नाटक सरकार इंधनावर  प्रवेश कर घेत असल्याने ते रद्द झाले. महाराष्ट्रात इंधनावर अधिभार लागू असल्याने याबाबत  जीएसटी करात कोणतीही तरतूद नसल्याने दरांत बदल होत आहेत.