Tue, Jun 18, 2019 20:30होमपेज › Kolhapur › ‘करवीर’चा अव्वल कारकून जेरबंद

‘करवीर’चा अव्वल कारकून जेरबंद

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कुणबी मराठा जातीच्या दाखल्यासाठी महसुली पुराव्यांतर्गत 1950 सालचा शेतीचा सात-बारा उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणार्‍या करवीर तहसील कार्यालयामधील अभिलेख शाखेतील अव्वल कारकून खैबर शरपुद्दीन नायकवडी (वय 57, रा. नायकवडी गल्ली, कागल) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. भाऊसिंगजी रोडवर बीएसएनएल कार्यालयासमोर पाठलाग करून संशयिताला जेरबंद करण्यात आले.

लाचप्रकरणी अव्वल कारकून जाळ्यात सापडल्यानंतर अवघ्या काही क्षणात कार्यालयासह परिसरात सन्नाटा पसरला होता. जागोजागी विखुरलेल्या एजंटांनी क्षणार्धात पोबारा केल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. नायकवडीला पकडल्यानंतर ‘एसीबी’चे निरीक्षक प्रवीण पाटील, श्रीधर सावंत यांच्यासह पथकाने कागल येथील घरावर छापा टाकला. सायंकाळपर्यंत तपासणी सुरू होती. संशयिताविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडर्नेली (करवीर) येथील शेतकरी भिकाजी वाडकर यांना मुलांच्या शैक्षणिक सवलतीसाठी कुणबी मराठा जातीच्या दाखल्याची आवश्यकता होती. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना 1950 सालच्या शेतीच्या सात-बारा उतार्‍याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वाडकर यांनी दि. 22 मे 2018 मध्ये करवीर तहसील कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला. पुढील पूर्ततेसाठी अर्ज अभिलेख कार्यालयाकडे आला.

तक्रारदाराने अभिलेख विभागातील अव्वल कारकून नायकवडी यांच्याशी संपर्क साधून उतार्‍याची मागणी केली असता, त्याने, तुमचे रेकॉर्ड फार जुने आहे.शोधून देण्यास वेळ लागेल, असे सांगून टाळाटाळीचा प्रयत्न केला. वारंवार भेट घेतल्यानंतर नायकवडी याने कामाच्या मोबदल्यात साडेचार हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यापैकी 1700 रुपयांसह कोर्‍या कागदाची रिम स्वीकारली. उर्वरित तीन हजार रुपये शुक्रवारी दुपारी घेऊन येण्यास सांगितले.

वाडकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्याशी संपर्क साधून नायकवडीविरुद्ध तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमाराला वाडकर तहसील कार्यालयात गेले असता, नायकवडीने त्यांना कार्यालयाबाहेर जाऊन थांबण्यास सांगितले. त्यानुसार वाडकर भाऊसिंगजी रोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर थांबले.काही काळात नायकवडी तेथे आला.

भाऊसिंगजी रोडवरून पळत सुटला

तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारत असतानाच आणखी पाच ते सहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. हा प्रकार सुरू असतानाच पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, प्रवीण पाटील, श्रीधर सावंत, मनोज खोत, संदीप पावलेकर, रूपेश माने आदींनी नायकवडीला घेरले. ‘एसीबी’चा सापळा लक्षात येताच नायकवडी भाऊसिंगजी रोडवरून पळत सुटला. पथकाने पाठलाग करून त्याला मध्यवर्ती चौकात पकडले. लाचप्रकरणी तहसील कार्यालयातील लिपिकाला भरचौकात जेरबंद करण्यात आल्याची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. परिणामी, भाऊसिंगजी रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

तहसील कार्यालयातझाली 22 वेळा पायपीट

मुलांच्या शिक्षणासह अन्य कारणासाठी कुणबी मराठा जातीचा दाखला मिळण्यासाठी वाडकर पाच- सहा महिन्यांपासून कामधंदा सोडून पाठपुरावा करीत आहेत. कागदोपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कचेर्‍यातील उंबरठेही त्यांनी झिजवले. शेतीच्या सात-बारा उतार्‍यासाठी वाडकर यांनी नायकवडी याची 22 वेळा भेट घेऊन विनवण्या केल्या; पण त्याने दाद दिली नाही. केवळ पैशासाठी अडवणुकीचा प्रयत्न केला, असेही पोलिस उपअधीक्षक गोडे यांनी सांगितले.

कागलमध्ये निलंबनाची कारवाई

नायकवडी याच्यावर झालेल्या कारवाईनंतर तहसील कार्यालय आवारात त्याच्या कारनाम्याची उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. कागल तहसील कार्यालयात कार्यरत असताना त्याच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाली होती. ‘अडवणूक करून पिळवणूक’ हा मिळकतीचा शॉर्ट मार्ग होता, असेही चौकशीतून निष्पन्न झाले आहे, असे गोडे यांनी सांगितले.