Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Kolhapur › पार्किंग समस्या गंभीर

पार्किंग समस्या गंभीर

Published On: Apr 16 2018 12:22AM | Last Updated: Apr 15 2018 11:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील वाहनांची संख्या तेरा लाखांवर पोहोचली आहे. त्यात महिन्याला सात ते आठ हजार नव्या वाहनांची भर पडत आहे. परगावाहून शहरात येणार्‍या वाहनांची संख्याही हजाराच्या घरात आहे. या सर्वांमुळेच शहरात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. वाहने लावायची कुठे? असा प्रश्‍न वाहनधारकांना सतावू लागला आहे. अनेकदा अनावधानाने वाहने ‘नो पार्किंग झोन’मध्ये लावल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. 

कोल्हापूर शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहनांची प्रचंड रहदारी आहे. ज्या परिसरात शासकीय कार्यालये, बँका, दवाखाने आहेत, त्या ठिकाणी तर वाहने उभी करायलाही जागा नसते. अशावेळी वाहनांना पार्किंगसाठी जागा शोधताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येते. काही व्यावसायिक आपली हद्द सोडून रस्त्यावर लोखंडी ग्रील टाकत असल्याने त्याचाही वाहनधारकांना फटका बसतो.

इमारतींचे पार्किंग कागदावरच!

शहरात कुठलीही इमारत उभी राहण्यापूर्वी त्यामध्ये पार्किंगसाठी स्वतंत्र सोय असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय अशा इमारतींना बांधकाम परवानाही मिळत नाही. असे असताना शहरातील अनेक नव्या इमारतींना पार्किंगची सोयच नाही. अशा ठिकाणी त्यांची वाहनेही रस्त्यावरच उभी केली जातात. त्यातून पार्किंग समस्या वाढू लागली आहे. महापालिका प्रशासनाने पार्किंग नसणार्‍या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला होता; पण तो जुजबीच होता. 

महापालिका-शहर वाहतूक शाखेकडून प्रयत्न अपेक्षित

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी आणि शहरात कुठेही ट्रॅफिक जामची समस्या उद्भवू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रयत्न करण्याची गरज आहे.