Wed, Jan 23, 2019 02:20होमपेज › Kolhapur › अग्निशमनची वाट पार्किंगमध्ये हरवली; कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

अग्निशमनची वाट पार्किंगमध्ये हरवली; कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

Published On: Jun 26 2018 2:34PM | Last Updated: Jun 26 2018 2:34PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

येथील पालिकेच्या अग्निशमन कार्यालयासमोरच तीनचाकी,चारचाकी वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग करण्यात आल्याने अग्निशमन वाहन जाण्यासाठी रस्ताच झाला बंद झाला आहे. जर एखादी आकस्मिक घटना घडली तर पार्किंगच्या विळख्यातून अग्निशमन वाहन जाणार कसे असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे? याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अग्निशमन विभागातील कमर्चाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

शहरातील दौलत शहावली भाजीपाला मार्केट येथे पालिकेच्या अग्निशमन वाहनांसाठी स्वतंत्र कार्यालय बांधण्यात आले आहे. या कार्यालयात दररोज कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या कार्यालयाचा पन्नास फुटापर्यंतचा परिसर नो पार्किंग म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. आज सकाळी येथील भाजीपाला मार्केटमध्ये येणारी दुचाकी,तीनचाकी,चारचाकी वाहने कार्यालयासमोरच अस्थाव्यस्त पार्किंग झाल्याने अग्निशमन वाहन जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. आज सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही वाहने पार्किंग करू नये हे सांगण्याऐवजी या दुर्लक्ष करत वाहन पार्किंग करण्यासाठी मुभाच दिली होती.

अग्निशमन विभागाच्या संपूर्ण कार्यालयाला अस्ताव्यस्त पार्किंगच्या वाहनांचा विळखा पडला होता.एखादी आकस्मिक घटना घडल्यानंतर वाहन जाणार कसे असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे. अग्निशमन कार्यालयामध्ये काम करत असताना हयगय करणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.