Wed, Mar 20, 2019 23:06होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी तहसीलदारांना घेराव

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी तहसीलदारांना घेराव

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 12:11AMकुरूंदवाड : प्रतिनिधी

तेरवाड (ता. शिरोळ) बंधार्‍याजवळ पंचगंगा नदीपात्रातील प्रदूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांना संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून प्रश्‍नांचा भडीमार करत तासभर रोखून ठेवले होते. 

दरम्यान, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दूरध्वनीवरून संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पंचगंगा प्रदूषणाबाबत सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींची गुरुवार (दि.19) रोजी बैठक बोलविली आहे. या बैठकीत हा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तहसीलदार गुरव यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या देऊन सोडून देण्यात आले.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पंचगंगा नदीपात्र प्रदूषित होते. यासाठी परिसरातील शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी आंदोलने करावी लागतात. या उन्हाळ्यात अधिकार्‍यांना रोखून ठेवण्याचा हा तिसर्‍यांदा प्रकार घडला. तरी प्रशासन याबाबत कठोर पावले उचलत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून पंचगंगा नदीपात्रात कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, प्रोसेस इंडस्ट्रियल इस्टेटचे सांडपाणी प्रक्रियेविना थेट नदीपात्रात मिसळत असल्यानेे पाणी प्रदूषित झाल्याने याचा जास्तीत जास्त फटका शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांना व गावांना बसत आहे.

नदी प्रदूषित करणार्‍या या घटकांवर कारवाई करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर जिल्हाधिकारी ते तहसीलदार कार्यालयापर्यंत निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या. इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन  बंधार्‍याजवळ समक्ष येऊन नदीची पाहणी करू, असे आश्‍वासन दिले होते. ते शुक्रवारी सकाळी येणार होते. मात्र, त्यांनी अचानक पाठ फिरवत आपले प्रतिनिधी म्हणून तहसीलदार गुरव यांना पाठवले होते.

तहसीलदार गुरव हे पाहणीसाठी आल्यानंतर शेतकरी संघटनेचे सागर शंभूशेटी, बंडू उमडाळे, विश्‍वास बालीघाटे यांनी प्रदूषित पाण्याबाबतचा प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांना घेराव घालून तासभर रोखून ठेवले होते. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दूरध्वनीवरून कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तहसीलदार गुरव यांना पंचगंगा नदीपात्रातील पाणी बाटलीत भरून त्यांना बाटल्या भेट देऊन त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सचिन शिंदे, तलाठी मच्छिंद्र कुंभार, योगेश जीवाजे, शाबगोंड पाटील, राजू पैलवान आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.