Fri, Aug 23, 2019 21:30होमपेज › Kolhapur › पर्यावरण मंत्र्यांचा कारवाईचा बडगा!

‘आयुक्त, मुख्याधिकार्‍यांवरर गुन्हे दाखल करा’

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असलेल्या सर्व कारखान्यांसह महापालिका आयुक्त, इचलकरंजीचे मुुुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच इचलकरंजी, हातकणंगले येथील प्रदूषित पाणी सोडणार्‍या प्रोसेसर्सना टाळे ठोकण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोेमवारी दिले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून पुण्य मिळविण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

मंत्री कदम सोमवारी सकाळी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. त्या निमित्ताने पंचगंगा प्रदूषणासंदर्भात सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामधाम येेथे आयोजित केली होती. ही बैठक घेण्यापूर्वी कदम यांनी जयंती नाला तसेच इचलकरंजी परिसरातील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी थेट नदीत मिसळत असल्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

बैठकीच्या सुरुवातीला मंत्री कदम म्हणाले, एक वर्षापूर्वी आपण पंचगंगा प्रदूषणासंदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. एक वर्षात काय उपाययोजना केल्या, त्याची माहिती त्यांनी द्यावी. महापालिकेत वर्षाला आयुक्त बदलत असतात. वर्षाला आयुक्त बदलण्याबाबत आपणास काही समजत नाही. शहरातील लोकांना प्रदूषित पाणी पाजले जाते. आणखी किती वर्षे त्यांनी असे दूषित पाणी प्यायचे. तुम्हा अधिकार्‍यांना ते पाजले तर चालेल काय? आता सहनशीलता संपली आहे. नियमाने कायदेशीर कारवाई केली जाईल.

महापालिकेने केलेल्या कामाबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, शहरात 96 एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी 55 एमएलडी पाणी जयंती नाल्यातून उपसले जाते व ते कसबा बावडा येथील सांंडपाणी प्रक्रियात केंद्रात नेले जाते. या ठिकाणी त्यावर प्रक्रिया केली जाते. दुधाळी येेथे 17 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी सुरू आहे. 10 जुलैपर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. बापट कॅम्प नाल्यावर 11.5 आणि लाईनबाजार नाल्यावर 5.5 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे.

आयुक्तांचे ऐकून घेतल्यानंतर मंत्री कदम यांनी, डॉ. चौधरी यांना तुम्ही मंत्र्यांना खोटी माहिती देता. खोटी माहिती देेताना तुम्हाला काही वाटत नाही. जयंती नाल्यातून थेट पाणी नदीत मिसळत असल्याचे मी सकाळी पाहिले आहे. यावर डॉ. चौधरी पावसामुळे बंधार्‍याच्या फळ्या काढण्यात आल्या असल्याचे सांगू लागले. तेव्हा मंत्री कदम अधिकच संतप्त झाले. ते म्हणाले, पाऊस आहे म्हणून नागरिकांनी दूषित असलेले पाणी प्यायचे? तुम्ही खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करत आहात. लोकांनाही तुम्ही फसवत आहात. कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही. पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी आंदोलन करत आहे. आंदोलन करणारे मूर्ख आहेत काय? शासनाला खोटी माहिती दिल्याबद्दल अणि फसवणूक केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई करण्यात येईल.

ते म्हणाले, पावसाळ्यात नाल्याचे पाणी थेट नदीत सोडणे योग्य आहे काय? पावसाळा असो अथवा नसो जयंत नाल्याच्या बंधार्‍याच्या फळ्या काढू नका. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी चालू ठेवा. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे थेट नदीत पाणी मिसळण्याचे प्रमाण कमी होईल. येत्या वर्षभरात रस्त्यांचे डांबरीकरण, टेंडर यापेक्षा नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न असलेल्या पंचगंंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी   प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोल्हापूर महापालिका आयुक्तांना झाडल्यानंतर मंत्री कदम यांनी आपला मोर्चा इचलकरंजी नगरपालिकेकडे वळविला. इचलकरंजीचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांना माहिती देण्यास सांगितले. सांडपाण्यावर करण्यात येणार्‍या प्रक्रियेची पाटील माहिती सांगू लागताच मध्येच थांबवत मंत्री कदम यांनी, तुम्हीदेखील खोटी माहिती देत आहात, असे खडसावले. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अनबलगम यांनी, इचलकरंजी नगराध्यक्ष आणि  मुख्याधिकारी या दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले.

अधिवेशन झाल्यानंतर दोन  महिन्यांनी मी पुन्हा दोन दिवस कोल्हापूरला केवळ पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी येणार आहे. दरम्यान, पंचगंगा नदीत कारखान्यातील थेट मिसळणारे पाणी नेमके कोणत्या कारखान्यांचे आहे, याचा शोध घ्यावा. आणि पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या सर्व घटकांवर गुन्हे नोंद करावेत, यातून कोणालाही सवलत देऊ नये, असे मंत्री कदम यांनी सांगितले.

दिलीप देसाई यांनी, पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्‍नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य, सचिवच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असून, बारा नाल्यांतील थेट पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे सांगितले. उदय गायकवाड म्हणाले, शहरात अजूनही ड्रेनेजची शंभर टक्के व्यवस्था झालेली आहे. कत्तलखाना बंद आहे. बेकायदेशीरपणे बॉक्साईटच्या खाणी सुरू आहेत. त्यावर कारवाई केली जात नाही. विजय देवणे म्हणाले, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी स्वतंत्र खास अधिकार्‍याची नेमणूक करावी. त्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही. आयुक्त केवळ बाहुले बनलेले आहेत. जलअभियंता बिनकामाचे आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. निधी आहेे पण काम केले जात नाही. याबाबत संबंधितांना आपण सूचना द्याव्यात.

माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी, पंचगंगा नदीत थेट मैला सोडला जातो तो प्रथम थांबावा, अशी मागणी केली. धैर्यशील माने यांनी, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी स्वतंत्र प्राधिकरण करावे व नदीकाठच्या गावांमध्ये एसटीपी करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. संजय पवार यांनी, नदीत थेट मैला सोडणार्‍या महापालिकेवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक, आ. सुजित मिणचेकर, आ. उल्हास पाटील, आ. अमल महाडिक उपस्थित होते.

निधी कमी पडणार नाही

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी निधीचा विषय आला तेव्हा मंत्री कदम यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत ते म्हणाले, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. ते सेकंड मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे मागणी करा, प्रस्ताव सादर करा, मी देखील बोलतो. मला खात्री आहे, आपणास निधी कमी पडणार नाही.