Mon, Nov 19, 2018 17:02



होमपेज › Kolhapur › पावसाची उघडीप; पंचगंगा पातळीत घट

पावसाची उघडीप; पंचगंगा पातळीत घट

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:07AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात मंगळवारी पावसाने उघडीप दिली. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. पंचगंगेची पातळी आता 35 फुटांखाली आली आहे. नद्यांची पातळी कमी होत असली, तरी अद्याप 47 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गांनीच सुरू आहे.

जिल्ह्यात अधनमधून कोसळणारी सर वगळता पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता 35.9 फुटांवर होती. ती रात्री 34.8 फुटांपर्यंत कमी झाली. पंचगंगेचे पाणी कमी झाल्याने गंगावेस-शिवाजी पूल हा रस्ता पूर्ण मोकळा झाला तो सकाळी महापालिकेने स्वच्छ केला. पावसाची उघडीप अशीच राहिली तर पंचगंगा उद्या बुधवारी पात्रात जाण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणाचा एकच स्वंयचलित दरवाजा खुला असून, 3 हजार 28 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातून 8 हजार विसर्ग सुरू असल्याने दूधगंगेची पातळी स्थिर आहे. दूधगंगा नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील आठ, पंचगंगेवरील सात, कासारीवरील सहा, वारणा व भोगावतीवरील प्रत्येकी पाच, ताम्रपर्णीवरील चार, घटप्रभा नदीवरील तीन तर तुळशी, कुंभी व हिरण्यकेशीवरील प्रत्येकी एक बंधारा पाण्याखाली आहे. गेल्या 24 तासांत तीन धरण परिसरात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरी 13.11 मि.मी.पाऊस झाला. राधानगरी 25.67 मि.मी.,गगनबावडा, चंदगडमध्ये प्रत्येकी 21 मि.मी.,शाहूवाडीत 22.66 मि.मी.,भुदरगडमध्ये 20 मि.मी., आजर्‍यात 15.25 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 5.85 मि.मी., करवीरमध्ये 5.63 मि.मी., पन्हाळ्यात 11.43 मि.मी., कागलमध्ये 6 मि.मी., शिरोळमध्ये 0.14 मि.मी. तर हातकणंगलेत 1.17 मि.मी. पावसाची नोंद झाली.