Thu, Jul 18, 2019 02:24होमपेज › Kolhapur › पंचगंगा पात्रात; 11 बंधारे खुले

पंचगंगा पात्रात; 11 बंधारे खुले

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पावसाने उघडीप दिल्याने तेरा दिवसांनंतर पंचगंगेचे पाणी शनिवारी पात्रात गेले. धरणांतील विसर्गही कमी झाल्याने नद्यांची पातळी वेगाने कमी होऊ लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील 11 बंधार्‍यांवरील पाणी उतरले 
असून, त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने कडकडीत विश्रांती घेतली आहे. शनिवारीही अधूनमधून कोसळणार्‍या तुरळक सरी वगळता पावसाची उघडीपच होती. जिल्ह्यात विशेषत: धरण परिसरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरणांतील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

राधानगरी धरणाचा खुला असलेला एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला. धरणातून 1,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातूनही सध्या 4 हजार क्युसेक, तर वारणेतून 4 हजार 569 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 24 तासांत 4 फुटाने कमी झाली. आज, शनिवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 28.7 फुटांपर्यंत खाली आली होती. रात्री ती 27.8 फुटांपर्यंत आणखी खाली गेली.
जिल्ह्यात शुक्रवारी 43 बंधारे पाण्याखाली होते, त्यातील 11 बंधार्‍यांवरील पाणी कमी झाले आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील चार, वारणा नदीवरील आठ, दूधगंगेवरील सात, वेदगंगेवरील सहा आणि कासारी नदीवरील एक असे 33 बंधारे सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याखाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दिवसभरात आणखी काही बंधार्‍यांवरील पाणी पातळी कमी झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 5.07 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत सर्वाधिक 16.33 मि.मी., तर गगनबावड्यात 15 मि.मी. पाऊस झाला. अन्य तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद झाली.