Wed, Jul 24, 2019 06:20होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील 25 एमएलडी मैला सांडपाणी थेट पंचगंगेत

कोल्हापुरातील 25 एमएलडी मैला सांडपाणी थेट पंचगंगेत

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:46PMकोल्हापूर: प्रतिनिधी - 

महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर शहरासाठी रोज 130 एम. एल. डी. पाण्याचा उपसा केला जातो. त्यापैकी तब्बल 80 टक्के म्हणजेच 104 एमएलडीच्यावर सांडपाणी तयार होते. त्यातील तब्बल 52 एमएलडी सांडपाणी रोज पंचगंगा नदीत मिसळत आहे. यात सुमारे 25 एमएलडी मैला सांडपाण्याचा समावेश आहे. परिणामी, पंचगंगा नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. 

कोल्हापूर शहरात सुमारे 127 छोटेमोठे नाले आहेत. त्यात प्रामुख्याने मोठे असलेल्या बारा नाल्यांचा समावेश आहे. या नाल्यातूनच कोल्हापूर शहरातील सांडपाणी व मैलामिश्रित सांडपाणी वाहून जात असते. जयंती नाला हा सर्वाधिक मोठा नाला असून, तब्बल 60 एम. एल. डी. सांडपाणी या नाल्यातून वाहते. काही वर्षांपूर्वी लाईन बझार येथे तब्बल 74 कोटी खर्च करून 76 एम. एल. डी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. बापट कॅम्प येथे 11 एम. एल. डी. व लाईन बझार येथे 5 एम. एल. डी. सांडपाणी वळविण्यासाठी यंत्रणा तयार झालेली नाही. त्यामुळे अद्यापही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. लाईन बझार येथील सांडपाणी प्रकल्पात जयंती नाल्यातील सांडपाणी नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. परंतु, त्या प्रक्रिया पूर्ण क्षमतेने होत नाही. परिणामी, प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतकरी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडण्यात येत आहे. आवश्यक ती प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत जात असल्याने प्रदूषणात आणखी भर पडत आहे.  
दुधाळी येथे 17 एम. एल. डी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे दुधाळी परिसरातील सांडपाण्याचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता आहे. मात्र, या ठिकाणी मैला सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामुग्री नाही. सद्यस्थितीत दुधाळी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नसल्याने 17 एम. एल. डी. सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. त्याबरोबरच लक्षतीर्थ नाला, फुलेवाडी नाला, जामदार क्लब नाला, जुना बुधवार पेठ नाला, सीपीआर नाला, न्यू पॅलेस नाला, ड्रीमवर्ल्ड नाला आदी ठिकाणच्या नाल्यांतून थेट मैलामिश्रित सांडपाणी नदीत मिसळत आहे. या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी 19 कोटींचा निधी आला आहे. परंतु, अद्याप तो निविदा प्रक्रीयेतच अडकला आहे.