Tue, Nov 20, 2018 16:57होमपेज › Kolhapur › पंचगंगा 21 फुटांवर

पंचगंगा 21 फुटांवर

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पावसाने उघडीप दिली असली, तरी पंचगंगा नदीची पातळी अद्याप 21 फुटांवर आहे. दिवसभरात अवघ्या दोन फुटांनी पाणी कमी झाले. सकाळी 8 वाजता पातळी 23.9 फुटांवर होती. रात्री 9 वाजता ती 21.10 फुटांपर्यंत खाली आली होती. जिल्ह्यातील 15 बंधार्‍यांवर अद्याप पाणी आहे. यामुळे त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 6.31 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात 34 मि.मी. इतका नोंदवला गेला. शाहूवाडीत 20 मि.मी., राधानगरीत 10 मि.मी., चंदगडमध्ये 3 मि.मी., भुदरगडमध्ये 2 मि.मी., पन्हाळ्यात 2 मि.मी., तर कागलमध्ये 1 मि.मी.पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात मात्र चांगला पाऊस सुरू आहे. तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. यामुळे जून महिन्यातील सरासरी पावसाने गाठली नाही. जून महिन्यात पडणार्‍या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी 86 टक्केच पाऊस झाला.
तासभर धुवाँधार आणि त्यानंतर दोन-चार तास उघडीप असा पाऊस शनिवारी दिवसभर दिसून आला. पावसाच्या या उघडझापपणामुळे शेतकर्‍यांना मशागतीस वेळ मिळाला. त्यामुळे आज शेताच्या मशागतींना वेग आल्याचे दिसून आले.