Tue, Mar 19, 2019 05:41होमपेज › Kolhapur › ‘पंचगंगा’ पातळीत वाढ; धनगरवाडी तुडुंब, चित्री 30 टक्के

‘पंचगंगा’ पातळीत वाढ; धनगरवाडी तुडुंब, चित्री 30 टक्के

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:35PMइचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी व परिसरात अद्याप म्हणावा तसा मुसळधार पाऊस झालेला नाही. या परिसरात पावसाने रिमझिम वगळता अद्याप हुलकावणी दिली आहे. तरीदेखील पंचगंगाच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. धरण क्षेत्रात कोसळणार्‍या पावसामुळे ही वाढ होत असून नदीवरील लहान पुलाच्या आसपास पाण्याची पातळी आली आहे. 

पावसाळ्यास प्रारंभ झाला असला तरी इचलकरंजी व परिसरात अद्याप पावसाने हुलकावणीच दिली आहे. एकच दिवस पावसाची संततधार शहरवासियांनी अनुभवली. त्यानंतर आकाश निरभ्रच असून नागरिकांसह परिसरातील शेतकर्‍यांना पावसाची ओढ लागली आहे. 

असे असले तरी कोकण पट्ट्यात व धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. इचलकरंजीतील पाण्याची पातळी 45.9 फुटावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पंचगंगा नदीघाट परिसर पाण्याखाली जात आहे. मात्र अद्याप पूर स्थिती निर्माण झालेली नाही. तरीदेखील पालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये अग्निशामक दल, यांत्रिक बोट, रुग्णवाहिका, पालिकेचे बचाव पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. 

आजर्‍यात संततधार कायम

आजरा : वार्ताहर

सुरु असलेल्या संततधार पावसामुळे  तालुक्यातील धनगरवाडी धरण आज गुरुवारी सकाळी 9.30 वाजता भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन 10 से.मी. ने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. चित्री धरण परिसरात 63 मि.मी. पाऊस झाला असून आज अखेर 558 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसापासून  धरण क्षेत्र परिसरात पावसाचा जोर आहे. आजरा तालुक्यात आज सरासरी 21 मि.मी. तर एकूण 254 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धनगरवाडी धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे 93 द. ल. घ. फु.ने तुडूंब भरले असून 10 से.मी. ने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गेल्यावर्षी 29 जून रोजी धनगरवाडी धरण भरले होते. मात्र चालुवर्षी अगोदर एक दिवस धनगरवाडी भरल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. चित्री धरण 30 टक्के भरले असून 496 द. ल. घ. फु. पाणीसाठा झाला आहे. तर एरंडोळ धरण 27 टक्के भरले असून 39 द. ल. घ. फु. व खानापूर धरण 26 टक्के भरले असून 8 द. ल. घ. फु. पाणीसाठा झाला आहे. आज दिवसभरात गवसे परिसरात 66 मि.मी., आजरा परिसरात 15 मि.मी व मलिग्रे परिसरात 5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरुन वाहत आहेत. हिरण्यकेशी नदी पात्राबरोबर वाहत असून जोरदार पावसामुळे तालुक्यात शेती कामांना वेग आला आहे. तालुक्यातील पावसाची सरासरी पाहता आज अखेर गवसे मंडलमध्ये स र्वाधिक पाऊस झाला असल्याचे स्पष्ट होते. तर सर्वात कमी मलिग्रे मंडलमध्ये पावसाची नोंद झाली आहे.

पासार्डे पाझर तलाव ओव्हर फ्लो

कोल्हापूर :पासार्डे (ता.करवीर) पाझर तलाव पहिल्याच पावसात ओव्हर फ्लो तलावाचे काम मार्च सन 2016-17 ला सुरु करुन पहिल्याच वर्षी तलाव 60 टक्के पाणी अडवले होते. 2017-18 ला काम पूर्ण करुन तलाव गेल्यावर्षी पूण क्षमतेने अडविण्यात आले होते. परंतु गेल्या पावसाळ्यामध्ये तलावाच्या मध्यभागी भराव खचल्याने तलावास धोका निर्माण झाला होता. ग्रामस्थानी तक्रार केल्यानंतर सदर काम चालू वर्षी एप्रील व मे मध्ये दुरुस्ती करुन नवीन पिचींग करण्यात आले. तलावामध्ये येणार्‍या पाण्याचा स्त्रोत मोठा असल्याने, तलाव मंगळवारी सकाळी भरुन वाहू लागला आहे. त्यामुळे लोकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.