Wed, Jul 17, 2019 18:44होमपेज › Kolhapur › पंचगंगा घाटाची लागली ‘वाट’

पंचगंगा घाटाची लागली ‘वाट’

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:26AMकोल्हापूर : सागर यादव  

कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीच्या स्वच्छतेसाठी एकीकडे लोकसहभागातून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र नदीवरील ऐतिहासिक घाटाची अवस्था अक्षरश: दयनीय झाली आहे. गणेशोत्सवांतर्गत होणार्‍या घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा पंचगंगा घाटाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

करवीर काशी असे धार्मिक महत्त्व, छत्रपतींच्या समाधीस्थळांचा परिसर म्हणून ऐतिहासिक महत्त्व आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या वैदिक प्रकरणाचा साक्षीदार असल्याने पंचगंगा नदी घाटाला सामाजिकद‍ृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. शिवाय तब्बल दोन हजार वर्षांपूर्वी कोल्हापूरचा परदेशांशी असणार्‍या व्यापारी संबंधाची साक्षीदार असणारी ब्रह्मपुरीही पंचगंगा नदीकाठावरच आहे. यामुळे पंचगंगा नदीघाट जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू शकते. अशा या ऐतिहासिक घाटाचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे, अशी मागणी कोल्हापूरच्या नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. 

घाटावरच्या ऐतिहासिक मंदिरे, समाध्या, घाटाच्या पायर्‍या मोडकळीस आल्या आहेत. ऐतिहासिक व धार्मिक मूर्ती-शिल्पाकृती इतरत्र पडल्या आहेत. स्वतंत्र धोबी घाट असतानाही तो सोडून इतरत्र कपडे, जनावरे व वाहने यांची धुलाई नागरिकांकडून बिनधास्त सुरू असते. घरात नको असलेल्या वस्तू थेट नदी घाटावर आणि पाण्यात टाकल्या जात असल्याने परिसराला अक्षरश: कचरा कोंडाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी परतीचा मार्ग असणारा परिसर अत्यंत दुर्लक्षित असल्याचे वास्तव आहे.