Sat, Jan 25, 2020 06:50होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषण : मनपाची वीज एक तासभर तोडली

पंचगंगा प्रदूषण : मनपाची वीज एक तासभर तोडली

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा प्रदूषणास जबाबदार धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने गुरुवारी महापालिकेचा विद्युत पुरवठा एक तासासाठी तोडण्यात आला. महावितरणतर्फे सकाळी साडेअकरा ते साडेबारा या वेळेत ही कारवाई करण्यात आली. शिवसेना शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांची भेट घेऊन महापालिकेवर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, वीजपुरवठा तोडल्याने महापालिकेवर नामुष्कीची वेळ आली.

पंचगंगा प्रदूषण रोखण्यात मनपास वारंवार  अपयश  येत  आहे. प्रदूषण रोखण्यासंदर्भात उपाययोयजना कराव्यात याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस सूचना दिल्या आहेत. तरीही महापालिकेकडून काहीच हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश महावितरण कंपनीस दिला आहे. या आदेशाची प्रत घेऊन शिवसेना शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांना भेटून महापालिकेवर कारवाईची मागणी केली. अधीक्षक अभियंता सोनवणे आणि कार्यकारी अभियंता सुनील माने यांच्या आदेशानुसार अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता रवीराज काळभोर यांच्या पथकाने महापालिकेस भेट देऊन मुख्य इमारतीचा विद्युत पुरवठा तोडला. सुमारे एक तास वीजपुरवठा बंद होता. साडेबारानंतर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता ए. ए. अस्वले, शाखा अभियंता फाळके यांच्यासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. 

महावितरणचे अधीक्षक अभियंता सोनवणे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात संजय पवार, विजय देवणे, दुर्गेश लिंग्रस, सतीश बिडकर, सुजित चव्हाण, प्रवीण पालव, राजेंद्र पाटील, पप्पू कोंडेकर आदींचा समावेश होता.