Thu, Sep 20, 2018 12:40होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे काम लवकरच मार्गी

पर्यायी पुलाचे काम लवकरच मार्गी

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोणताही प्रश्‍न समजून घेतला की त्याचे उत्तर निश्‍चित मिळते, पंचगंगेवरील पर्यायी पुलाचा प्रश्‍न समजून घेतला, त्यातून आपत्ती व्यवस्थापनाचा पर्याय पुढे आला. आता पुुलाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यक्‍त केला. सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पर्यायी पुलाच्या उर्वरित बांधकामासाठी सोमवारी वर्क ऑर्डर काढण्यात आली. लवकरच पुलाचे अर्धवट राहिलेले काम सुरू होईल. पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्याबाबत मोहिते आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रयत्न केले. या पार्श्‍वभूमीवर कृती समितीच्या वतीने आज मोहिते यांचा कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला.

मोहिते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखताना सामाजिक द‍ृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक असते. शिवाजी पुलाचा विषय गंभीर आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर उत्तर शोधताना सामाजिक द‍ृष्टिकोनातूनच विचार करत होतो. त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा पर्याय सापडला. कृती समिती आणि प्रशासन यांनी परस्परावर विश्‍वास ठेवून हा विषय पुढे नेला तर या कामाला गती मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पवार, किशोर घाटगे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, अनिल कदम, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, वसंतराव मुळीक, चंद्रकांत बराले, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, संपत पाटील, किसन कल्याणकर, विजय पाटील, एस. के. माळी, लालासाहेब गायकवाड, महादेव पाटील, श्रीकांत भोसले, तानाजी पाटील, दिलीप माने, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

आजपासून काम सुरू होण्याची शक्यता
पर्यायी पुलाबाबत सोमवारी वर्क आर्डर देण्यात आली आहे. यामुळे मंगळवारपासून काम सुरू होईल, अशी शक्यता होती. मात्र, यंत्रसामुग्री जागेवर आणण्यासाठी विलंब झाल्याने पुलाच्या दुसर्‍या बाजूचे काम बुधवार (दि.16) पासून सुरू होण्याची शक्यता आहे.