Tue, Nov 13, 2018 07:59होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात पोस्टर उतरवून 'पद्मावत' रिलीज

कोल्हापुरात पोस्टर उतरवून 'पद्मावत' रिलीज

Published On: Jan 25 2018 6:18PM | Last Updated: Jan 25 2018 6:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बहूचर्चित पद्मावत सिनेमा गुरुवारी शहरातील प्रमुख चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला. तत्पूर्वी पोलिसांच्या सूचनेनुसार थिएटरबाहेरील पोस्टर्स उतरविण्यात आली. सकाळच्या सत्रात काही आंदोलकांनी शो बंद करण्याची मागणी केली. परंतु, किरकोळ बाचाबाची वगळता पोलिस बंदोबस्तामध्ये चित्रपट रिलीज झाला. गुरुवारी दिवसभरातील सर्व शोला प्रतिसाद मिळाल्याचेही चित्रपटगृह चालकांकडून सांगण्यात आले. 

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर चित्रपटगृहावरील डिजीटल फलक उतरविण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या. यानुसार चित्रपटगृहाबाहेरील फलक उतरविण्यात आले. अगदी सकाळी साडे दहापासून रात्री उशिरापर्यंतच्या शोचे बुकिंग झाले आहे. देशभरात पद्मावत सिनेमाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. चित्रपटातील काही प्रसंगाचे चित्रीकरण कोल्हापुरातील पन्हाळ्यानजीक असणार्‍या मसाई पठारावर झाले आहे. याठिकाणीही काही संघटनांनी सेट पेटविल्याने तेव्हापासूनच कोल्हापूरकरांमध्ये चित्रपटाबाबत औत्सुक्य होते. गुरुवारी चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पद्मावत चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनीही कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. 

शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त अधिक प्रमाणात तैनात करण्यात येणार असल्याचे शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.