Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : गवताच्या गाड्यासह बैल पंचगंगेत बुडाला

कोल्हापूर : गवताच्या गाड्यासह बैल पंचगंगेत बुडाला

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहानेे गवताने भरलेल्या एक्क्यासह बैल बुडाला. एक्क्यावरील शेतमजुराला पोहता येत नसल्याने नागरिकांनी शर्थीच्या प्रयत्नांनी पाण्यातून बाहेर काढले. रविवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेत बैलाचा मात्र अंत झाला. शीतल सुरेश रोडेे (वय 42, रा. शिपुगडे तालमीनजीक, बुधवार पेठ) असे शेतमजुराचे नाव आहे. 

शीतल रोडे हा गवळी गल्‍लीतील शिवाजी रावजी नाईक (वय 63) यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करतो. रविवारी पंचगंगा नदी परिसरातील गवत कापल्यानंतर एक्क्यामध्ये भरून तो येत होता. गवतामध्ये चिखल असल्याने तो साफ करण्यासाठी पंचगंगा घाटाजवळून पाण्यात उतरला. एक्‍का काही अंतर आत पाण्यात नेला. प्रवाह अधिक असल्याने बैल बिथरला. एक्‍का उलटून दावण गळ्यात अडकल्याने बैल पाण्यात बुडू लागला. शीतल रोडे यालाही पोहता येत नसल्याने त्याने आरडाओरडा केला. घाटावर असणार्‍या काही तरुणांनी पाण्यात उडी मारून रोडे याला पाण्याबाहेर आणले. मात्र, बैलाचा जीव वाचविता आला नाही. 

नाईक यांना अश्रू अनावर

शिवाजी नाईक यांच्या मालकीचा एक्‍का व बैल असून काही वेळापूर्वीच ते गवत भरण्यास आले होते. त्यांच्या डोळ्यांदेखतच मृत बैलाला पाण्याबाहेर काढण्यात आले. कुटुंबातील एक घटक समजून ते जनावरांची देखभाल करीत होते. मृत बैलाला पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.