कोल्हापूर : प्रतिनिधी
महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणातील मुख्य संशयित, निलंबित पोलिस अधिकारी अभय कुरूंदकर व अन्य मारेकर्यांची पाठराखण करण्याचा मुंबईतील काही पोलिस अधिकार्यांकडून उघड प्रयत्न सुरू असल्याचा बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. दरम्यान, अश्विनीला न्याय मिळण्याची शक्यता नसल्याचा आरोप करत कोणत्याही क्षणी स्वत: मंत्रालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा अश्विनीचे 75 वर्षीय वडील आणि माजी सैनिक जयकुमार बिद्रे यांनी गुरुवारी दिला.
सैन्यदलात 18 वर्षे सेवा झालेले बिद्रे यांची मुलगी अश्विनी बिद्रे-गोरे यांचा दोन वर्षांपूर्वी पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरने साथीदारांच्या मदतीने खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी वूड कटरने मृतदेहाचे तुकडे करून मीरा-भाईंदर येथील खाडीत फेकून दिल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.
अश्विनीच्या अस्थीसाठी दोन वर्षे उंबरे झिजवतोय अश्विनीच्या अस्थीसाठी जयकुमार बिद्रे, त्यांचे कुटुंबीय, पती राजू गोरे व दहा वर्षांची मुलगी सिद्धी दीड वर्षापासून मुंबई मंत्रालयासह अधिकार्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत; पण न्याय मिळत नसल्याची त्यांची खंत आहे. वडील, आई निर्मलादेवी (65), पती राजू गोरे हतबल झाले आहेत. बिद्रे यांनी परवा नातीसह मुंबई गाठली. बुधवार, गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, पोलिस महासंचालक सतीश माथूर तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयही गाठले. मारेकर्यांना कठोर शासन व्हावे, यासाठी वृद्धापकाळातही धडपडतो आहे. तथापि, तपास प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकारी मारेकर्यांनाच मदत करीत असल्याचे उघड्या डोळ्यांनी आपणाला पाहावे लागत आहे, असा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनात केला.
मुलीला न्याय मिळावा, यासाठी जवळपास सर्वच जबाबदार घटकांना भेटलो; पण अद्याप न्याय मिळाला नाही. भविष्यात मिळेल याचीही शक्यता दिसून येत नाही. धर्मा पाटलासारख्या शेतकर्याला आत्महत्या केल्यावरच न्याय मिळतो. त्यामुळे मी माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रालयात कोणत्याही क्षणी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी मुख्यमत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.