होमपेज › Kolhapur › जेवायला बसलेल्या भाविकांच्या गराड्यात शिरली भरधाव मोटार

जेवायला बसलेल्या भाविकांच्या गराड्यात शिरली भरधाव मोटार

Published On: Apr 16 2018 1:12AM | Last Updated: Apr 16 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जोतिबा डोंगरावरील यमाई मंदिर परिसरात वळणाचा अंदाज न आल्याने मोटारकार भाविकांच्या गराड्यात शिरली. जेवणासाठी बसलेल्या दोन महिलांसह चिमुरडा जखमी झाला. रविवारी दुपारी हा अपघात झाला. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पल्‍लवी बाबुराव सरतापे (वय 29), शार्दूल बाबुराव सरतापे (5, रा. विजवडी, माण, सातारा), हेमा सचिन मोरे (वय 30, रा. बिदाल, माण, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. पल्‍लवी सरतापे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

माण येथील सरतापे व मोरे कुटुंबीय रविवारी सकाळी क्रूझरमधून जोतिबाच्या दर्शनाला आले होते. दर्शन आटोपून सोबत आणलेले जेवण करण्यासाठी यमाई मंदिर परिसरात गेले होते. रस्त्याच्या बाजूला असणार्‍या झाडाखाली सर्व जण जेवत असताना जोतिबा मंदिराकडून यमाई मंदिराकडे एक भरधाव कार आली. वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट जेवणासाठी बसलेल्या लोकांच्या गराड्यात शिरली. पल्‍लवी सरतापे काही अंतर कारसोबत फरफटत गेल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. 

जखमींना तत्काळ खासगी वाहनातून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कोडोली पोलिसांत सुरू होते.