Mon, Aug 19, 2019 09:52होमपेज › Kolhapur › ...अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही

...अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 26 2018 11:30PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

अतिक्रमणबाबत सर्वसामान्यांना एक आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय देणार्‍या महापालिका प्रशासनाने सोमवारपर्यंत तावडे येथील महापालिकेच्या जागेवर मालकीचे फलक लावावेत, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा अधिकारी, कर्मचार्‍यांना कार्यालयात बसू न देता खुर्च्या फेकून देण्यात येतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

शिवसेनेतर्फे गुरुवारी महापालिका नगर रचना कार्यालयात विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांना तावडे हॉटेल जागेवरील अतिक्रमणाबाबत जाब विचारण्यात आला.  खोत यांच्यावर विविध प्रश्‍नांची सरबत्ती करून धारेवर धरले. तातडीने कारवाई करा, अन्यथा कार्यालयातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने कार्यालयातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. सर्वसामान्यांनी एखादे अतिक्रमण केल्यास तातडीने कारवाई करणारे यंत्रणा महापलिकेच्या तब्बल 250 एकर जागेवर शेती, उद्योग व्यवसाय अशी विविध प्रकारची अतिक्रमणे सुरू असताना गप्प का, असा संतप्‍त सवाल यावेळी आंदोलकांनी केला. पैसेवाल्यांना पाठीशी घालत असल्याने या धनदांडग्यांचे असे धाडस होत आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कोणाच्या दबावाखाली कारवाई रोखता,  कुणाचाही दबाव न घेता संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि ज्यांनी अतिक्रमण केले आहे, अशा सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वेअर कावळे, नारायण भोसले आणि धनंजय खोत यांना आंदोलकांनी प्रश्‍नांचा भडिमार करून भंडावून सोडले. 

किती लोकांना डीआरसी प्रमणापत्र दिले. हे प्रमाणपत्र देण्यासाठी घाई करता मग अतिक्रमणधारकांवर कारवाईसाठी का विलंब लावला ?  महापालिकेच्या जागेवर आजही बांधकामे सुरू असताना कारवाई का करीत नाही ? खोत यांनी बराले यांच्याकडे पत्र दिल्याचे सांगताच बराले यांना पाचारण करण्यात आले. बराले आणि खोत यांना समोरासमोर घेऊन प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. अखेर बराले आणि खोत यांनी संयुक्‍तपणे कारवाईचे आश्‍वासन दिले. गुरुवारी दिवसभरात संबंधित जागेवर फलक लावण्यात येईल आणि दोन दिवसांत गुन्हे दाखल केले जातील, असे आश्‍वासन देण्यात आले. सोमवारपर्यंत आम्ही वाट पाहू सोमवारनंतर कार्यालयात येेऊ नका, कार्यालयात खुर्च्या ठेवणार नाही, असा सज्जड इशारा संजय पवार यांनी दिला. आंदोलनात संजय पवार, रवी चौगुले, शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Tags : Kolhapur,  otherwise, would ,not, allowed, sit, office