Fri, Apr 26, 2019 15:24होमपेज › Kolhapur › ‘त्या’ नगरसेवकांवर ‘वॉच’

‘त्या’ नगरसेवकांवर ‘वॉच’

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 11 2018 11:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे कारभारी सारे काही ‘आलबेल’ असल्याचे दाखवत आहेत; परंतु प्रत्यक्षात कुणाचाच कुणावर ‘विश्‍वास’ नसल्याची स्थिती आहे. एकमेकांना ‘गाफील’ ठेवून दगाफटका करण्यासाठी आतल्या गोटातून ‘व्यूहरचना’ आखली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच वरवर नगरसेवक ‘खेळीमेळीत’ असल्याचे दाखवत असले, तरी फुटू शकणार्‍या ‘त्या’ नगरसेवकांवर कारभारार्‍यांचा ‘वॉच’ (नजर) आहे.

सोमवारी होणारी महासभा विद्यमान महापौर स्वाती यवलुजे यांच्या कालावधीतील शेवटची असणार आहे. सभेनंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने नवीन निवडीच्या हालचाली सुरू होणार आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने महापौर निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी जोरदार खेळी केली जात असल्याचे सागंण्यात येते. अडीच वर्षांसाठी महापौरपदाचे आरक्षण असल्याने एकदाच काय असेल ते ‘खर्च’ होऊ दे, असेही ठरले असल्याचे नगरसेवकांतून सांगितले जात आहे. 

विरोधकांकडून होणार्‍या फोडाफोडीच्या राजकारणापासून ‘लांब’ ठेवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोमवारी रात्रीपासूनच सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले जात असल्याची चर्चा आहे. भाजप-ताराराणी आघाडीतही नगरसेवक फोडून ‘बिघाडी’ करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांना चांगलाच ‘भाव’ आला आहे. सत्ताधारी व विरोधक त्या त्या पक्षातील नगरसेवकांसोबत सहलीला ‘एकत्र’ असले, तरीही प्रत्यक्ष महापौर निवडणुकीला मतदानावेळी काय होईल, हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.