Wed, Jun 26, 2019 11:50होमपेज › Kolhapur › संघटित आंदोलन उभारण्याची गरज

संघटित आंदोलन उभारण्याची गरज

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 12:31AMइचलकरंजी : प्रतिनिधी

देशाचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजीचा नावलौकीक आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि शेकडो लोकांना रोजगार देणारा वस्त्रोद्योग मात्र गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या खाईत लोटला आहे. वस्त्रोद्योग संपतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. वस्त्रोद्योगाला संजीवनी देण्यासाठी आता संघटितपणे आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी केेले. वस्त्रोद्योगातील समस्या सोडवण्यासाठी यंत्रमागधारकांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. वस्त्रोद्योगातील प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रांत कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या यंत्रमागधारकांच्या धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते.

राज्याचे वस्त्रोद्योग धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. यंत्रमाग वगळता वस्त्रोद्योगातील इतर घटकांना या धोरणात योग्य न्याय देण्यात आला आहे. मात्र, वस्त्रोद्योगाचा मुख्य घटक असणार्‍या यंत्रमागाकडे सरकारने पाठ फिरवली आहे. वस्त्रोद्योगाचा केंद्रबिंदू असणार्‍या वस्त्रोद्योगाला नवीन जाहीर झालेल्या वस्त्रोद्योग धोरणात योग्य स्थान देण्यात आले नाही. परिणामी, अडचणीत असणार्‍या यंत्रमागधारकांच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे किमान येत्या अर्थसंकल्पात तरी यंत्रमागधारकांना दिलासा मिळावा, यासाठी यंत्रमागधारकांच्या काही प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील यंत्रमागधारकांनी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.

इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने यंत्रमागधारकांच्या विविध मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. वस्त्रोद्योग मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्‍वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अद्याप ठोस अशी भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांना  प्रतियुनिट 2 रुपये दराने वीज, व्याजदरात 5 टक्के सवलत यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली. 

यंत्रमाग उद्योगाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासनाने वीज दरात सवलत आणि यंत्रमाग महामंडळाकडून बीमांचा पुरवठा करणे गरजेचे असल्याचे मत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी मांडले.