होमपेज › Kolhapur › पाच महिन्यांच्या बाळाच्या पोटातून काढला ट्यूमर

पाच महिन्यांच्या बाळाच्या पोटातून काढला ट्यूमर

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

सीपीआरमधील डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत आपला हातखंडा कायम राखला आहे. इचलकरंजी येथील अवघ्या पाच महिन्यांच्या बाळाच्या पोटातील ट्यूमरची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. वसंतराव देशमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवप्रसाद हिरूगडे यांच्या सांघिक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

डॉ. रामानंद म्हणाले, विराज कल्ले या पाच महिन्यांच्या बाळाचे पोट जन्मताच फुगलेले होते. व दिवसेंदिवस ते वाढतच होते. वजनात वाढ होत नव्हती व श्‍वास घेण्यास त्रास होत होता. अनेक खासगी रुग्णालयांत नातेवाईकांनी बाळाच्या पोटात असणार्‍या गोळ्याची चाचणी करून घेतली. पोटात 15 बाय 15 सेंटीमीटरची गाठ असल्याचे निदान झाले. पालक विनोद कल्ले यांनी बाळाला सीपीआर येथे 17 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल केले. सीपीआरच्या शल्यचिकित्सा शास्त्राचे विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख व सहकारी डॉक्टरांनी जोखीम पत्करून बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. 

यावेळी बाळाचे वडील विनोद किल्ले म्हणाले, आम्ही बाळाच्या पोटाच्या विविध चाचण्या करून घेतल्यानंतर त्याला ट्यूमर झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी खर्चाची मोठी रक्‍कम सांगितली. त्यामुळे आम्ही बाळाला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळाला पुनर्जन्मच दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
पत्रकार बैठकीला वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, डॉ. वसिम मुल्ला, शशिकांत राऊळ, आदी उपस्थित होते. ही शस्त्रक्रिया डॉ. विजय कस्सा, डॉ. हरिश पाटील, डॉ. के. के. मेंच, डॉ. मधूर जोशी, डॉ. नीता, भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. राऊत यांनी परिश्रम घेतले.