Tue, May 21, 2019 22:26होमपेज › Kolhapur › शाळा बंद निर्णयावर खुली चर्चा करू : तावडे

शाळा बंद निर्णयावर खुली चर्चा करू : तावडे

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 12:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शाळा बंद व शाळा कंपनीकरण कायद्याबाबत डाव्या विचारसरणींच्या नेत्यांकडून खोटा प्रचार सुरू आहे. त्यांनी बिंदू चौकात येऊन खुली चर्चा करावी, असे आव्हान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. दहा पटांखालील शाळांचे समायोजन केले असताना काही लोक खोटे अभियान राबवून पालकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिक्षणमंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठातील अतिथीगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

यावेळी मंत्री तावडे म्हणाले, दहा पटांखालील शाळांचे समायोजन केल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळू शकते. 1300 पैकी 547 शाळांचे समायोजन केले आहे. काही शाळांबाबत प्रवास व्यवस्थेच्या अडचणी आहेत, त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाळा बंद निर्णयाबाबत पालकांनी केलेल्या एसएमएसवर आपण स्पष्टीकरण दिले आहे. ठराविक विचारसरणीच्या लोकांनी ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांनाही आंदोलनात सहभागी करून घेऊन त्यांची दिशाभूल केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे बहुजन समाजातील विद्यार्थी गुणात्मक शिक्षणापासून दूर लोटला जात आहे. त्यांचा हा कुटील डाव भाजप सरकार हाणून पाडील.

राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले आहे. 13 ‘ओजस’ व शंभर ‘तेजस’ शाळांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ‘ओजस’ शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 15 जूनला आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई शाळांपेक्षा अधिक दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. सरकार क्‍लस्टर विद्यापीठे निर्माण करणार आहे. 10 ते 20 कॉलेजचे मिळून स्वायत्त विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियानातून मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यात ‘रयत’ सारख्या संस्था पुढे येत आहेत. 

चाईस बेस्ड क्रिडीट सिस्टिम हे क्‍लस्टर विद्यापीठाचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही एका शाखेची पदवी न मिळता आंतरविद्याशाखीय दृष्टिीकोनातून वेगवेगळ्या शाखांची पदवी घेऊन पदवीधर होता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण हक्‍क कायद्यानुसार ‘टीईटी’ परीक्षा देणे गरजेचे आहे. शालार्थ प्रणाली दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच शिक्षकांचे वेतन ऑनलाईन होणार आहे. केंद्र सरकारचा पूर्व प्राथमिक शिक्षण आरटीईत आणण्याचा मानस आहे. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज व्यवस्थित चालले नसल्याने अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्राध्यापक भरतीवरील बंदी लवकरच उठणार असून, त्याबाबतची फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव निधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे तावडे म्हणाले. 

राज्यात शिक्षक पदे रिक्‍त आहेत. आगामी काळात 24 हजार शिक्षकांचे पदे भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त जागांचा आकडा समजेल. त्यानंतर पद भरती  होईल, असे तावडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे राज्यातील 1300 शाळा बंदबाबत कोणताही अभ्यास न करता धादांत राजकीय खोटे बोलले, असेही मंत्री  तावडे म्हणाले.

अटींच्या पूर्ततेनंतर शाळांना अनुदान 
काँग्रेस सरकारने विनाअनुदानित शाळांचा केवळ ‘कायम’ हा शब्द काढला. परंतु, या शाळांना अनुदान दिले नाही. भाजप सरकारने 20 टक्के अनुदान दिले आहे. 1 व 2 जुलै रोजी घोषित शाळांना काही अटी पूर्ण केल्यास येत्या काळात अनुदान मिळेल. जनतेने भाजप सरकार आणण्यास उशीर केल्यामुळे प्रश्‍न प्रलंबित आहेत, असेही तावडे म्हणाले. 

Tags : openly discuss, school off, minister tavade