Wed, Jan 16, 2019 10:01होमपेज › Kolhapur › ‘ऑनलाईन’ वाचनाकडे तरुणाईचा कल!

‘ऑनलाईन’ वाचनाकडे तरुणाईचा कल!

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:51PMकोल्हापूर : पूनम देशमुख

सध्याच्या युवा पिढीमध्ये वाचन कमी झाले आहे, अशी ओरड नेहमीच होते. हा गैरसमज जागतिक पातळीवर काम करणार्‍या ऑडिओ बुक कंपन्यांनी दूर केला आहे. आता ऑनलाईनच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून युवक वर्ग पुन्हा एकदा वाचनाकडे आकर्षित झाला आहे.

 हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा हेडफोन लावून पुस्तक ऐकणारे वाचक अधिक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढत असून त्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. वाचकांमध्ये प्रामुख्याने तरुणवर्गांचा समावेश असून हलकं फुलकं वाचण्याकडे त्याचा कल असतो. इंटरनेटमुळे डिजिटल लायब्ररी, ऑनलाईन लायब्ररी, पुस्तकांच्या असंख्य साईटस् आता एका क्लिक वर उपलब्ध आहेत. आज ऑनलाईन वेबसाईटवर अनेक पुस्तके घरबसल्या वाचायला मिळतात, त्यामुळे वाचन करणे सोपे झाले आहे.

युरोप, अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये ऑडिओ पुस्तके यापूर्वीच आली असल्याने तेथील तरुण पिढीही या पुस्तकांची चाहती आहे. भारतामध्ये गेल्या दोन  वर्षांत ऑडिओ  बुकचा अधिक प्रसार आणि प्रचार झाला असून त्याला तरुणाईचा प्रतिसादही लाभतो आहे. काही पुस्तक कंपन्यांनीही आता त्यांची मराठीतील पुस्तके ऑडिओ माध्यमातून वाचकांसमोर आणली गेली आहेत. यामध्ये 18 ते 49 या वयोगटातील वाचकांचा सर्वाधिक समावेश आहे. ऑडिओ पुस्तकांमध्ये वाचकांना मुख्यत: कथा, कांदबर्‍या, रहस्यमय गोष्टी, प्रेरणादायी जीवनचरित्रांना अधिक प्राधान्य मिळते आहे.