Sun, May 19, 2019 14:45
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आता घरबसल्या वीज बिल ‘नावात बदल’ शक्‍य

आता घरबसल्या वीज बिल ‘नावात बदल’ शक्‍य

Published On: Mar 16 2018 10:10PM | Last Updated: Mar 17 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

खरेदी-विक्री, बक्षीसपत्र, मृत्यू, वारसा आदी कारणांमुळे मिळकतीला लागलेल्या नावात बदल करावा लागतो.  वीज बिलातील ‘नावात बदल’  करण्यासाठी कालपर्यंत ग्राहकांना बर्‍याच अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते. आता मात्र हा बदल घरबसल्या व ऑनलाईन करता येणार आहे. 

महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे नावात बदल करण्याची सुविधा सहा मार्चपासून उपलब्ध झाली आहे. त्यासाठी आपणास गुगल प्लेस्टोअर, अ‍ॅपल स्टोर, विंडोज स्टोर व महावितरण संकेत स्थळावरून ‘Mahavitaran Consumer App’ S> डाऊनलोड करावे लागेल. यापूर्वीच अ‍ॅप घेतले असेल तर 5.20 ही सुधारित आवृत्ती अद्ययावत करणे गरजेचे आहे. 

महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी ग्राहक आहेत. तसेच दरवर्षी काही लाख ग्राहकांची भर त्यात पडते. खरेदी-विक्री, बक्षीसपत्र, मृत्यू, वारसा, विभक्‍त कुटुंब पद्धती आदींमुळे मिळकतीचे नावे बदल असतात. मालकी हक्‍कात नाव बदलल्यास इतर विभागाप्रमाणे वीज बिलाच्या नावात बदल करणेही गरजेचे असते. त्यासाठी पूर्वी कार्यालयात जाणे अपरिहार्य होते. विविध अर्जासोबत ‘प्रपत्र’ भरावे लागे. तर पुराव्यासाठी बरीच कागदपत्रे जोडावी लागायची. आता ‘प्रपत्र’ मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे. मिळकतीचे नाव बदलल्याचा पुरावा व सुरक्षा ठेव नवीन ग्राहकांच्या नावे करण्यासाठी ‘Form X’ चा फोटो काढून अपलोड केला की नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते. येणार्‍या बिलामध्ये नाव बदलून येते. त्यासाठी कोणालाही भेटण्याची गरजच नाही, हे विशेष.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या दूरद‍ृष्टीतून व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रयत्नाने बहुतांश ग्राहकसेवा मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हेलपाटे कमी होत आहेत. सेवा ग्राहकाभिमूख व वापरण्यास सहज झाल्याने ग्राहकही सुखावत आहे. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, वीज बिल पाहणे, भरणे, तक्रारी नोंदवणे, त्याचा पाठपुरावा करणे, रीडिंग नोंदवणे, जुन्या बिलांचा इतिहास आदी सुविधा सुरुवातीपासूनच अ‍ॅपमध्ये उपलब्ध होत्या. मार्च महिन्यात आलेल्या 5.20 या अद्ययावत आवृत्तीमध्ये नावात बदल करणे, तसेच त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करण्याची सुविधा नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच अ‍ॅपची नोंदणी करणेही सोपे आहे.