Mon, Sep 24, 2018 09:08



होमपेज › Kolhapur › आजपासून शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन 7/12 : चंद्रकांत पाटील

आजपासून शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन 7/12 : चंद्रकांत पाटील

Published On: May 01 2018 12:43PM | Last Updated: May 01 2018 12:43PM



कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांना आजपासून ऑनलाईन 7/12 देण्याचा जगाच्या इतिहासातील क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 40 हजार गावातील 4 लाख शेतकऱ्यांचे 7/12 ऑनलाईन झाले आहेत. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरबसल्या लॅपटॉपवर ऑनलाईन 7/12 उपलब्ध होईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतना केली.  

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहु स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत गायन व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात पोलिस दल, गृहरक्षक दल, वनरक्षक दल, बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, सीसीसटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, मोबाईल फॉरेसिक लॅब पथक, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, अग्नीशमन पथक, निर्भया पथक, 108 पथक आणि मुद्रा योजनेचा चित्ररथ अशा विविध विभागांची पथके सहभागी झाली होती. याबरोबरच शालेय मुला-मुलींनी समुहगान सादर केले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केले असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. याबरोबरच महाराष्ट्राच्या भुमिने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य बाल गंगाधर टिळक, आगरकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे थोर समाज सुधारक जन्माला दिले. महाराष्ट्राला आकार देण्याचं काम स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी केले अशा या संमृध्द, संपन्न महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याचं काम गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने हाती घेतले असून यापुढील काळातही विकासाचे अनेकविध‍ प्रकल्प राबवून महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य  बनविण्याच्या दृष्टीने शासनाची वाटचाल सुरु आहे. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य बनविण्याच्या प्रयत्नात राज्यातील जनतेनेही शासनास साथ द्यावी. जाती, पंथ, भाषा विसरुन भारतीय आहोत याचा अभिमान बाळगावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आजच्या महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला ऑनलाईन 7/12 देण्याचा शुभारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असून आतापर्यंत 40 हजार गावातील 7/12  ऑनलाईन झाले आहेत. उर्वरित गावातील शेतकऱ्यांचे 7/12 डिजिटल स्वाक्षरीसह येत्या महिन्याभरात पूर्ण करुन  शेतकऱ्यांना आपल्या घरात लॅपटॉपद्वारे ऑनलाईन 7/12 उपलब्ध होईल, अशी क्रांतीकारी व्यवस्था शासनाने केली असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळ निर्माण करण्याचं काम शासनाने हाती घेतले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनाने मुंबईचा मेट्रो प्रकल्प पूर्ण केला असून पुणे आणि नागपूर मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून दळण वळणाला गती दिली आहे. राज्यात रस्त्याचं जाळ निर्माण करण्याच्या हेतुने 5 हजार किलो मीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरी रस्ते 22 हजार किलो मीटरचे केले आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे 3 पदरी 10 हजार किलो मीटरचे रस्ते करण्याबरोबरच उर्वरित रस्ते दर्जेदार बनविले जातील, असे एकूण 89 हजार किलो मीटरचे रस्ते येत्या दोन वर्षात बनवून राज्याच्या दळण वळणाला गती आणि दिशा दिली जाईल. 

राज्य शासनाने 34 हजार कोटीची क्रांतीकारी कर्जमाफी योजना राबवून राज्यातील 50 लाखावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही दिले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 86 हजार शेतकऱ्यांना 361 कोटीची कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर व्याज अनुदान दिले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखावरुन 8 लाख केली आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांची निम्मी फी शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. 10 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या तरुणांचे 6 लाखापर्यंतचे व्याज शासन देणार आहे. तसेच 3 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. 

वीरपत्नी/वीरमातांना एसटी महामंडळाच्यावतीने स्मार्टकार्ड
शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमातांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत सर्व प्रकाराच्या राज्य परिवहन बस मधून अजीवन मोफत प्रवास करण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने स्मार्टकार्ड देण्याबरोबरच अशा शहीद जवानांच्या वारसांना एसटीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी 8 लाखाची मदत वाढवून ती आता 25 लाख करण्यात आली असल्याची घोषणाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच विदर्भातील 4 लाख 25 हजार शेतकऱ्यांना भूमी स्वामी योजनेंतर्गत वर्ग 2 च्या जमिनी, वर्ग 1 च्या करुन देण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्रातील सिंध्दी समाजाकडील जमिनी त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. 

42 गावे व कोल्हापूर शहरासाठी नवे प्रकल्प आणणार
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्यात आले असून या प्राधिकरणामार्फत शहराजवळच्या 42 गावांचा नियोजनबध्द विकास करण्यावर शासनाने लक्ष केंद्रीत केले असून यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्राधिकरणाच्यावतीने येत्या दोन-तीन वर्षात 42 गावे आणि कोल्हापूर शहरासाठी विकासाचे नवे प्रकल्प आणण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्यावतीने गेल्या वर्षी विविध विकास योजनांवर 99 टक्के खर्च केला आहे तर अनुसूचित जाती योजनेवर 100 टक्के खर्च करुन कोल्हापूर जिल्हा महराष्ट्रात प्रथम स्थानावर आला आहे. महसूल विभागानेही 117 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या गावा गावात शाश्वत जलसाठे निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून यंदा 80 गावांची निवड करुन जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा थेंब अणं थेंब अडविला जात आहे. गेल्या तीन वर्षात आयकर भरणाऱ्यांची संख्या साडेतीन कोटीवरुन सात कोटीवर केली आहे. राज्यात जीएसटी नवीन नोंदणी 6 लाखावर गेली असून आयकर जीएसटी अशा माध्यमातून देशाचं आणि राज्याचं उत्पन्न वाढ असल्याचेही ते म्हणाले. 

Tags :  chandrakant patil, Revenue minister, Maharashtra, online 7/12, farmer