होमपेज › Kolhapur › रेबीजने तरुणाचा मृत्यू

रेबीजने तरुणाचा मृत्यू

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 1:10AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर व परिसरात कुत्रे चावल्याने रेबीजने मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर गेली. रेबीजची लागण झालेल्या संकेत अभयकुमार नांदणे-सरडे (वय 23, मूळ रा. कोथळी, सध्या रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी, धरणगुत्ती) या तरुणाचे उपचार सुरू असताना सांगली सिव्हिल रुग्णालयात शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी उमर सय्यद (वय 26) या तरुणाचा कुत्रे चावल्याने व गावठी औषध घेतल्याने रेबीज लागण होऊन मृत्यू झाला होता.

दोन महिन्यांपूर्वी संकेत हा नांदणी येथे आजोळी गेला होता. त्यावेळी घरातील पाळीव कुत्र्याच्या दोन महिन्यांच्या पिलाने चावा घेतला होता. तीन दिवसांपूर्वी त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यात रेबीजची लक्षणे आढळल्याने येथून भारती हॉस्पिटल व त्यानंतर सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.शनिवारी दिवसभार त्याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर शनिवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. कोथळी येथे अंत्यविधी करण्यात आले. उदगाव येथील टेक्निकल हायस्कूलचे शिक्षक अभयकुमार नांदणे यांचा संकेत हा  एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू असा परिवार आहे.

शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. विजयमाला नगरातील आराधना कोरे या आठ वर्षीय बालिकेचा लचका कुत्र्यांनी तोडला. तर सौ. कांबळे, तीन बांधकाम कामगारांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यानंतर पालिकेने गेल्या दोन दिवसांत भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांत 132 कुत्री पकडल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मच्छी मार्केट, काडगे मळा परिसरातील कुत्री पकडल्याचा दावा पालिकेने केला असला, तरी या परिसरात अद्याप भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सर्व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.