होमपेज › Kolhapur › वर्ग चार अन् गुरुजी एक

वर्ग चार अन् गुरुजी एक

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 01 2018 11:31PM

बुकमार्क करा
सांगरूळ : मोहन कारंडे  

उदात्त हेतू ठेवून सरकारने प्राथमिक शिक्षण सक्‍तीचे केले असले तरी अनेक शाळांतील प्रमुख समस्याच सोडविण्यात मात्र अजूनही भक्‍कम पावले उचलली नसल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. 

दुर्गुळेवाडी (ता.करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्‍क एका शिक्षकावर 1 ली ते 4 थी अशा चार वर्गांची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे एका वर्गाला शिकवावे तर बाकीच्या तीन वर्गांत गोंधळ निर्माण होत असल्याने या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे केवळ आश्‍वासने देऊन जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्‍त होत आहे. 

सध्या दुर्गुळेवाडी शाळेत जवळपास 40 विद्यार्थी शिक्षण घेतात. केवळ दोन वर्गात भरणार्‍या या शाळेत दोन वर्षांपूर्वी दोन शिक्षक ज्ञानदानाचे काम करत होते. त्यानंतर एका शिक्षकाची बदली झाली, पण रिक्‍त पदांवर आजतागायत नव्या शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने शाळेचा सर्व भार एकाच शिक्षकावर पडला आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिपाईही या सर्वांचे व्यवस्थापनाचा ताण एकच शिक्षक पेलत आहे. परिणामी ज्ञानदानाच्या कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

दरम्यान, त्या शिक्षकाला शासकीय कामे, मासिक कामे, पोषण आहार, त्याचबरोबर दररोज ऑनलाईन रिपोर्ट आदींसह शासकीय कामांचा त्रासही रोजचा असतो. त्यामुळे या सर्व व्यापातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम हा शिक्षक करत आहे. येथे विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थितीचे प्रमाणही चांगले आहे, त्यामुळे विद्यार्थी असूनही त्यांच्या ज्ञानसाधनेवर मर्यादा येतात. त्यामुळे या शाळेत किमान दोन शिक्षक असणे गरजेचे आहे.

याबाबतची मागणी पालकांतून अनेकवेळा करूनही प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शाळेसह विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता पालकांना लागून राहिली  आहे. ज्या इयत्तेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्‍कम व्हायला पाहिजे, त्याचवेळी शासनाच्या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होत आहे. याला जबाबदार फक्‍त शासन असल्याच्या भावना पालकांतून व्यक्‍त होत आहेत. सध्या शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विशेषतः डोगराळ वाड्या-वस्त्यांवरील शाळांना बसणार आहे. यामध्ये या शाळेचा समावेश होतो की काय अशी शंका ग्रामस्थातून व्यक्‍त होत आहे.  शहरामध्ये मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात, पण खेड्यांमध्ये मराठी शाळांशिवाय पर्याय नसतो व त्यातच चार चार वर्ग एकच शिक्षक सांभाळत असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही.