Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Kolhapur › दोन सभापती अन् एक कार्यालय

दोन सभापती अन् एक कार्यालय

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:15PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

कुरूंदवाड पालिकेतील बांधकाम समिती सभापतींच्या कार्यालयावर महिला बालकल्याण समिती सभापतींनी हक्‍क सांगितल्याने  कार्यालय एक, आसन एक मात्र  नावाचे फलक दोन अशी वाटणी बांधकाम समिती दालनाची झाली आहे.

गेल्या वर्षीपासून महिला बालकल्याणला कार्यालय नसल्याने  माजी सभापती सौ. गीता बागलकोटे यांचा कार्यकाळ कार्यालयाविना गेला. आज, उद्या कार्यालय मिळेल अशा आश्‍वासनातच वर्ष गेले. आता माझाही कार्यकाळ कार्यालयाविना जाऊ नये म्हणून विद्यमान महिला बालकल्याण समिती सभापती सौ. नरगीस बारगीर यांनी बांधकाम समिती सभापतींच्या कार्यालयावर आपला फलक लावून हक्‍क सांगितला आहे. याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली. त्यामुळे कार्यालयाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

कुरूंदवाड पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ही पदे सोडली तर इतर तीन सभापतिपद रोटेशन पद्धतीने वाटून घेण्याचे ठरले आहे. 5 तारखेला झालेल्या सभापती निवडीत काँग्रेस पक्षाकडे सार्वजनिक बांधकाम समिती सभापती हे एक पद आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाणीपुरवठा व महिला बालकल्याण अशी दोन सभापतिपदे मिळाली आहेत.

गेल्या वर्षी विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयावरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली होती. या दरम्यान बांधकाम समिती सभापती, पाणीपुरवठा समिती सभापती व विरोधी पक्षनेता यांना स्वतंत्र कार्यालय निर्माण करून देण्यात आली होती. नूतन महिला बालकल्याण समिती सभापती सौ. नरगीस बारगीर यांची निवड झाल्यानंतर बांधकाम समिती सभापतींच्या कार्यालयावर यांचाही फलक दिसू लागला आहे. तर कार्यालयातील एकाच टेबलावर नावाच्या दोन पाट्या दिसत आहेत. मात्र, आसन एकच आहे. त्यामुळे कार्यालय, आसन एक, सभापतींचे फलक दोन असे त्रांगडे पालिकेत पाहावयास मिळत आहे. 

सभापतींना कार्यालये देण्याचे सर्व अधिकार शासनाने नगराध्यक्षांना दिले आहेत. पालिकेकडे महिला बालकल्याण समिती सभापतींना कार्यालय दिल्याची कोणतीही नोंद नाही. त्यांना कार्यालय देणेबाबत कोणत्याही परिपत्रकात असा उल्लेखही नाही. सौ. नरगीस बारगीर यांना मात्र स्वतंत्र दालनासाठी भटकंती करावी लागत आहे. बांधकाम सभापतींशी चर्चा करून त्यांनी कार्यालयात आपला फलक लावला असावा, असे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सांगितले.