Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Kolhapur › कबनुरात एस.टी.खाली सापडून बालिका ठार

कबनुरात एस.टी.खाली सापडून बालिका ठार

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:46AMकबनूर : वार्ताहर 

कबनूर-इचलकरंजी मार्गावरील आजरा सहकारी बँकेसमोर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास एस.टी. बस व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात आराध्या राजाराम माने (वय 4, रा. बागडे गल्ली, कबनूर) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे मामा गोरख रामचंद्र तोरस्कर (30, रा. सनी कॉर्नर) हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तातडीने सांगली येथे हलवण्यात आले. या अपघातातून आराध्याचे वडील राजाराम बाळू माने (28) हे बचावले. 

या एस.टी.पाठोपाठ गोरख तोरस्कर, आराध्या माने व तिचे वडील राजाराम माने हे मोटारसायकलवरून इचलकरंजी येथे जात होते. एस.टी. आजरा बँकेनजीक आली असता एस.टी.च्या उजव्या बाजूस रस्ता रिकामा झाल्याचे पाहून तोरस्कर यांनी तेथून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांचा तोल जाऊन गोरख तोरस्कर व आराध्या माने हे मोटारसायकलवरून पडून एस.टी.च्या मागील चाकाखाली सापडले. त्यात आराध्या जागीच ठार झाली, तर गोरख तोरस्कर हे गंभीर जखमी झाले. यावेळी राजाराम माने हे बाजूला पडल्याने या अपघातातून ते सुदैवाने बचावले. गर्दी वाढल्याने एस.टी. चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.