Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Kolhapur › जुन्या गाड्यांना मिळाले गिर्‍हाईक

जुन्या गाड्यांना मिळाले गिर्‍हाईक

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:13PMकोल्हापूर: नसिम सनदी 

जिल्हा परिषदेतील जुन्या गाड्यांना अखेर गिर्‍हाईक मिळाले आहे. चार वेळा निविदा आणि सहा महिन्यांची प्रतीक्षा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला हे यश आले आहे. 12 पैकी 8 जुन्या गाड्यांची विक्री अंतिम टप्प्यात असून यात सर्वाधिक संख्या अ‍ॅम्बॅसिडर गाड्यांची आहे. या गाड्यांच्या विक्रीतून जि.प.च्या उत्पन्नात दोन ते अडीच लाखांची भर पडणार आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकार्‍यांना शासकीय वाहन असते. अध्यक्ष व सीईओंना प्रत्येकी 8 लाख तर पदाधिकारी व विभागप्रमुखांना प्रत्येकी 6 लाख रुपये याप्रमाणे वाहन खरेदीसाठीच्या रकमेची तरतूद केली जाते. 2 लाख 40 हजार किलोमीटर रनिंग अथवा 10 वर्षे वयोमर्यादा असे गाड्यांचे आयुर्मान ठरवले जाते. हे आयुर्मान ओलांडल्यानंतर संबंधित गाड्यांची इतरांना विक्री अथवा भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू होते. 

जिल्हा परिषदेत आजच्या घडीला कागलकर हाऊससमोरील रिकाम्या जागेत 30 ते 35 वाहने अशीच जीर्ण अवस्थेत पडून आहेत. यातील 12 वाहने ही बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहेत. त्यात अ‍ॅम्बॅसिडर, मार्शल व सुमो गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या सुस्थितीत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून याच्या लिलावाची प्रक्रिया बांधकाम विभागाकडून राबवली जात आहे. आतापर्यंत चारवेळा निविदा काढली गेली, पण प्रतिसाद मिळाला नाही. पाचव्यांदा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अ‍ॅम्बॅसिडर व मार्शलसाठी काही जणांनी निविदा भरली आहे. 

अ‍ॅम्बॅसिडरची 18000 ते 19500 रुपये तर मार्शल व जीपसाठी 53000 ते 70,000 रुपये मुल्यांकन आरटीओ व इरिगेशनच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगनी केले आहे. या मूल्यांकनानुसार किंमत गृहीत धरून ही निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लिलाव प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला 2 लाख 18 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांनी दिली. 

अ‍ॅम्बॅसिडर गाडी ही पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानाच्या ताफ्यात होती. जि.प. अध्यक्षांच्या ताफ्यातही हीच गाडी होती. ऑटो इंडस्ट्री वेगाने बदलल्याने अ‍ॅम्बॅसिडर गाडी मागे पडली. शिवाय त्याचे उत्पादनच बंद झाल्याने पार्टस् मिळणेही मुश्कील होऊन बसले आहे. गाडीचा रुबाब जरी मोठा असला तरी त्याचा मेटेन्सही त्याच पटीत असल्याने कितीही हौस असली तरी ही गाडी सांभाळणे अलीकडे शक्य नाही. त्यामुळेच वारंवार निविदा प्रसिद्ध करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नव्हता. पण, अखेर यातील 5 गाड्या आता विकल्या जात आहेत.