Wed, May 22, 2019 10:52होमपेज › Kolhapur › दुर्मीळ, औषधी वनस्पतींच्या तस्करीचा धोका

दुर्मीळ, औषधी वनस्पतींच्या तस्करीचा धोका

Published On: Feb 04 2018 1:51AM | Last Updated: Feb 04 2018 12:27AMकागल : बा. ल. वंदूरकर

पर्यावरण रक्षणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवड योजना राबविण्यात येत असतानाच, दुसरीकडे विविध प्रकारच्या झाडांची तोड आणि वाहतुकीवरील निर्बंध उठविले जात आहेत. 

त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल तर बुडणारच आहे, त्याचबरोबर दुर्मीळ व औषधी वनस्पतींची तस्करी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
रब्बरहुड, बांबू, नीलगिरी, लिंब, उंबर त्यानंतर आता सिल्वर ओक, मलबार निम, इंडियन विलो, आकेशिया, महारूख, बाभूळ या झाडांच्या तोड व वाहतूक परवान्याला वन विभागाने सूट दिली आहे. जंगले नष्ट होत आहेत. झाडांची तोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल ठेवण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. दरवर्षी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहेत. कोटी अन् शतकोटी वृक्षलागवडीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अशा योजनांमधून किती वृक्ष लावले आणि किती जगले? याचा हिशेब मात्र लावला जात नाही. 

शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता एकीकडे वृक्षलागवडीच्या योजना राबविण्यात येत असतानाच, दुसरीकडे वृक्षतोड आणि त्याच्या वाहतुकीवरील निर्बंध उठविण्यात येत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सिल्वर ओक या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या झाडांना लाकूड व्यवसायात चांगली मागणी आहे.  त्यामुळे सॉ मिल व्यवसायाशी संबंधित संघटनांनी झाडांच्या काही प्रजातींना वाहतूक निर्बंधातून वगळण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्र शासनाने काही वृक्षांना वाहतूक निर्बंधातून वगळले. तशी अधिसूचना दि. 1 फेब्रुवारी 2018 रोजी काढली आहे.

या अगोदर बांबू आणि इतर वनस्पतींवरील निर्बंध शेतकर्‍यांसाठी उठविण्यात आले आहेत. जंगलातील बांबू हे हत्ती आणि गव्यांचे मुख्य खाद्य आहे. आता त्यांना त्याचा तुटवडा भासत असल्यामुळे जंगलातून हत्ती, गवे चार्‍यासाठी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत.  

लाकडांच्या फ्री पासचा फायदा घेऊन या लाकडांमधून चंदन, सिसम, रक्‍तचंदन, सागवान या दुर्मीळ वनस्पतींची चोरटी वाहतूकही वाढण्याचा धोका आहे.