Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Kolhapur › प्राधिकरण कार्यालयाला शिवसैनिकांकडून टाळे

प्राधिकरण कार्यालयाला शिवसैनिकांकडून टाळे

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्राधिकरण म्हणजे काय, हेच लोकांना समजलेले नाही. ज्या गावांचा समावेश करण्यात आला आहे, तेथील नागरिकांत संभ्रम आणि भीती आहे, ती दूर होईपर्यंत या कार्यालयाची गरजच काय, असे ठणकावत मंगळवारी शिवसेनेने कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यालय बंद करण्यास भाग पाडले. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना कार्यालयाला टाळे ठोकण्यास लावले. प्राधिकरणाबाबत जोपर्यंत व्यापक बैठक होत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडू नका, अन्यथा ते पेटवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

प्राधिकरणाच्या नावाखाली हद्दवाढ केल्याची भावना यामध्ये समावेश करण्यात आलेल्या 42 गावांची आहे. या गावांचा विकास होण्याऐवजी, परवानगीच्या नावाखाली जाचक अटी लादून ग्रामीण जीवनच उद्ध्वस्त केले जात आहे. मोगलाईसारखा कारभार केला जात आहे. हा ग्रामीण जनतेवर अन्याय आहे. तो सहन केला जाणार नाही, असे सांगत शिवसेनेच्या वतीने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांना धारेवर धरण्यात आले.

प्राधिकरण म्हणजे काय, हे लोकांना समजले आहे का, तसे समजून तुम्ही कधी सांगितले आहे का, असा सवाल पाटील यांना करण्यात आला. प्राधिकरणाची स्थापना होऊन वर्ष होत आले आहे. या कालावधीत आपण काय केले, किती ग्रामपंचायतींचे ठराव घेतले, त्यांची संमती नसताना प्राधिकरणात या गावांचा समावेश कसा काय करण्यात आला, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. समंतीशिवाय या गावांचा समावेश झाला, त्यांच्यावर काही लादण्याचा प्रयत्न झाला तर तो शिवसेना हाणून पाडेल, असे सांगत आजपर्यंत प्रबोधनासाठी काहीच करण्यात आलेले नाही. कर्मचारीही नाहीत. केवळ जाचक अटी लादून लोकांची बांधकाम परवानगीसाठी अडवणूक करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

जोपर्यंत प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या गावांची बैठक होत नाही तोपर्यंत हे कार्यालय सुरू राहूनही उपयोग नाही. यामुळे ते बंद करा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. यावेळी बांधकाम परवानगीसाठी विमानतळ प्राधिकरणाचा नाहरकत दाखल्याची आणि 30 फुटी रस्ता हवा या दोन प्रमुख अटी रद्द करा, अशा मागण्यांचे निवेदनही पाटील यांना देण्यात आले. यानंतर बिनकामाचे हे कार्यालय सुरू असूनही उपयोग नाही. ते बंद करा, असे म्हणत शिवसैनिकांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना कार्यालय बंद करणे भाग पाडले. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शिवाजीराव पाटील, सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, तानाजी आंग्रे, राजू यादव आदी सहभागी झाले होेते.