Sat, Jul 20, 2019 11:17होमपेज › Kolhapur › -तर कुर्‍हाड, काठी, मेंढरांसह रस्त्यावर

-तर कुर्‍हाड, काठी, मेंढरांसह रस्त्यावर

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 25 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याचा निर्णय आठ सप्टेंबर या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनापर्यंत घ्यावा, अन्यथा त्यानंतर कुर्‍हाड, काठी व मेंढरांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा समस्त धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात देण्यात आला. धनगर समाजाचा समावेश यापूर्वीच अनुसूचित जमातीत झाला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

सभेत बोलताना माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, धनगर आणि धनगड हे एकच आहेत; पण यातील ‘र’ व ‘ड’ यामुळे समाजाच्या चार पिढ्या उद्ध्वस्त होण्याचे पाप महाराष्ट्राच्या मातीत घडले. आताची पाचवी पिढी हे आरक्षण न देणार्‍यांना उद्ध्वस्त करायला मैदानात उतरली आहे. आम्ही धनगर आहोत, हे सांगण्यासाठी कोणत्या अहवालाची किंवा सर्टिफिकेटची  गरज नाही.

शेंडगे म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत धनगर समाजाच्या मेळाव्यात, सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याला भुलून आमच्या समाजाने तुम्हाला लोकसभा, विधानसभेला मतदान केले; पण गेल्या चार वर्षांत आम्हाला फसवण्याचाच कार्यक्रम सुरू आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, धनगर व धनगड हे एकच आहेत, धनगड वेगळे असतील तर ते दाखवा, नाहीतर आठ सप्टेंबरपर्यंत आरक्षण देण्याचा निर्णय घ्या. अन्यथा त्यानंतर आम्ही हातात कुर्‍हाड, काठी, खांद्यावर घोंगडे आणि सोबत मेंढरे घेऊन रस्त्यावर उतरू.

मोर्चाच्या वतीने मुलींनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विलासराव वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबुराव हजारे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे, शंकरराव पुजारी, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, नगरसेवक राजसिंह शेळके, आप्पासो हजारे, तानाजी हराळे, संजय अनुसे, बाच्यू बंडगर, बाबासो सावगावे, लक्ष्मण कोळेकर आदी उपस्थित होते.