होमपेज › Kolhapur › जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं पिवळं वादळ

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं पिवळं वादळ

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 24 2018 11:25PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कपाळाला भंडारा, डोक्यावर पिवळी टोपी, हातात पिवळा झेंडा आणि अंगावर पारंपरिक वेश परिधान केलेल्या कार्यकर्त्यांचं पिवळं वादळ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. निमित्त होतं समस्त धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काढलेल्या मोर्चाचे. 

‘धनगर की जोत बात करेगा, वहीं महाराष्ट्र पे राज करेगा,’ असा इशाराही या मोर्चाच्या निमित्ताने झालेल्या सभेत लहान मुलींनी भाषणावेळी दिला. ‘आम्ही धनगर, धनगर अन् दौलत आमची मेंढरं,’ असे गीतही एका मुलीने सादर केले. मोर्चात काही तरुणांनी समाजाचा पारंपरिक मेंढपाळाचा पोशाख परिधान केला होता. 

अनुसूचित जातीतून धनगर समाजाला आरक्षण द्यावे,  या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या कानकोपर्‍यातून समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. दसरा चौकातून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे दुपारी दीडच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. 

सभेसमोर बोलताना तनिष्का म्हैसाळे म्हणाली, मोडेन; पण वाकणार नाही, असा हा समाज आहे. धनगर व धनगड या दोन शब्दांत समाजाला अडकून ठेवले आहे. धनगड दाखवा नाही तर आरक्षण जाहीर करा. याशिवाय समाजातील तेजश्री वाळकुंजे, माऊली गावडे, श्रद्धा पुजारी, प्रज्ञा पुजारी, सायली पुजारी, श्रुती बरगाळे या शाळकरी मुलींनी तडाखेबंद भाषण करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. याच मुलींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकरी यांना निवेदन दिले..