Mon, Jul 22, 2019 03:35होमपेज › Kolhapur › धनगरांच्या पालावर कधी पेटणार विकासाच्या वाती?

धनगरांच्या पालावर कधी पेटणार विकासाच्या वाती?

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:44AM

बुकमार्क करा

कौलव : प्रतिनिधी 

धरणीचे अंथरूण आणि आकाशाचे पांघरूण करत बारा महिने रानोमाळ भटकणारा धनगर समाज विकासापासून शेकडो मैल दूर असून आमच्या नशिबाचे भोग कधी सरणार, असा प्रश्‍न या समाजाला पडला आहे. 

धनगर समाज महाराष्ट्रात सर्वत्र पसरला असून, मेंढपाळ हाच त्यांचा एकमेव व्यवसाय आहे. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत ते बकर्‍यांच्या चार्‍यासाठी गावोगावी मजल दरमजल करतात. उन्हाळ्यात पश्‍चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पायपीट करणारे धनगर पावसाळ्याच्या चार महिन्यांत सोलापूरसह उत्तर कर्नाटकात आसरा शोधतात. शेळ्या मेंढ्यांपासून बकर्‍यांची लोकर काढून त्यांची विक्री अथवा घोंगडी बनवून धनगर आपली रोजीरोटी चालवतात. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच ऊसतोड झाली की रान रिकामे होते. त्यामुळे  शेतकरी शेतात बकर्‍यांचा तळ बसवतात. त्याबदल्यात धनगरांना थोडाफार पैसे धान्य देतात. हेच त्यांच्या चरितार्थाचे साधन असते.  पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात पावसाची झड असते. त्याचा बकर्‍यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ती दगावतात. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना तळ दुष्काळी भागात हलवावा लागतो. धनगरांचा तळशेत शिवारासह डोंगर कपारीतही असतो. त्यामुळे त्यांना कशाचेच संरक्षण नसते. प्रसंगी बकर्‍यांची चोरी होते, बकर्‍या रोगराईने बळी पडतात. त्यांना वेळेवर औषधपाणीही उपलब्ध होत नाही. परिणामी, केवळ दैवावर हवाल ठेवूनच मजल दरमजल करावी लागते. धनगर तळ लोकवस्ती पासून दूर रानावनात असतो. त्यामुळे त्यांना अन्‍न-पाण्यापासून औषधापर्यंत कोणतीही सुविधा मिळत नाही. महिलांना पाणी आणण्यापासून बकरी राखणे, जेवण करणे यात दिवस कधी सरतो हेच कळत नाही. त्यामुळे महिलांचा विकास आणि सबलीकरण हे शब्द त्यांच्या गावीही नाहीत. 

मेंढपाळ व्यवसायावर रोजीरोटी चालवावी लागत असल्याने पिढ्यान् पिढ्या या व्यवसायात गुंतल्या आहेत. रानोमाळ भटकंतीमुळे मुला-बाळांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे नोकरी शोधायची कुठे? हेही त्यांना माहीत नाही.  शिक्षणाअभावी पुढच्या पिढीचीही होरपळ सुरू आहे. परिणामी, दारिद्र्य व भटकंतीचा शाप त्यांच्या कपाळी लिहिला आहे. पारंपरिक व्यवसाय व शिक्षणाचा अभाव यामुळे धनगरांची पाल तीन दगडांच्या चुलीच्या धुरात काळवंडली आहे. पोरंटारं जगवण्यासाठी रानोमाळ भटकण्याशिवाय दुसरा आधार न्हाई. मायबाप सरकारही आमच्यापर्यंत ईत न्हाई मग आमी जगायच तरी कसं ? असा सवाल सोंबराई गावडे व सखुबाई गावडे यांनी केला.