कोल्हापूर : पुनम देशमुख
लग्न, मुंज, बारसे, वास्तू शांती किंवा कुठलेही शुभ काम करण्यासाठी सर्वसाधारणपणे शुभ वेळ अर्थात मुहूर्त पाहिला जातो. पण आता काही जोडपी स्वत:चे अपत्य केव्हा जन्माला यावे, याचीही वेळ ठरवू लागले आहेत. जर सिझेरियन होणार असेल तर ते कधी करावे, याची वेळ ‘ऑन डिमांड’ गर्भवती किंवा तिच्या पतीकडून नक्की केली जावू लागली आहे. सिझेरियनमध्येही आता ‘मुहूर्त’ पाहिला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती पहायला मिळत आहे. सिझेरियनची वाढती मागणी पाहता अस्तित्वात येणारा ट्रेंड चुकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ली गर्भवतींमधील सहनशक्ती कमी झाल्याचे पहायला मिळत असल्याचे डॉक्टर्सकडून सांगण्यात येते. काही महिलांमध्ये नॉर्मल डिलीव्हरीच्या वेळी होणारा त्रास सहन करण्याची शक्ती नसते. तर काही दाम्पत्यांना ठराविक मुहूर्तावर बाळ जन्माला येणे अपेक्षित असल्याने डिमांड सिझेरियनचा ट्रेंड वाढत आहे. रूग्णांकडून सिझेरियनची मागणी केल्यावर डॉक्टर्स मागणी पूर्ण न करता, सिझेरियन आणि नॉर्मल डिलीव्हरीतील फरक समजावून सांगतात, त्यानंतर रूग्णाची गरज पाहुन सिझेरियन करतात.
पूर्वी डिमांड सिझेरियन हा प्रकार अस्तित्वात नव्हता. ऑपरेशनला रूग्ण घाबरत असल्याने सिझेरियनची मागणीही त्यांच्याकडून केली जात नसे. मात्र, सध्या अद्ययावत तंत्रज्ञान, औषधोपचार, रक्त पुरवठा, निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ यामुळे रूग्णांना ऑपरेशनची भिती राहिली नाही. गेल्या दशकात हा डिमांड सिझेरियनचा ट्रेंड वाढीस लागला. सध्या उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांत या ट्रेंडची मागणी जोर धरत आहे. डिमांड सिझेरियन हा नव्या युगातला बदलता ट्रेंड होत चालला आहे.
प्लॅन्ड सिझेरियन असेल तर ठिक, पण मागणी असेल तर चुकीचे आहे. सध्याच्या गर्भवती महिला नॉर्मल डिलीव्हरी होण्यास घाबरत आहेत. एकदा सिझेरियन केल्याने पुन्हा बाळंतपणावेळी धोका वाढण्याची शक्यता असते. पण ट्रेंड म्हणून सिझेरियन करून घेण्याची पध्दत योग्य नाही.
सिझेरियन डिलीव्हरीकडे ओढा
ठराविक मुहूर्तावर बाळ जन्माला यावे, अशी अपेक्षा प्रत्येक माता-पित्यांसह कुटूंबीयांमध्ये वाढू लागली आहे. त्यात फिगर मेंटेन, झिरो फिगर आणि डाएटिंग करण्यावर तरूणींसह महिलांचा ट्रेंड अधिक वाढत आहेे. त्याचा पुढचा प्रयत्न म्हणून सिझेरियन डिलीव्हरीकडे ओढा वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.