होमपेज › Kolhapur › 27 पोलिस अधिकार्‍यांना नोटिसा

27 पोलिस अधिकार्‍यांना नोटिसा

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मटका, तीन पानी जुगार अड्ड्यांसह रेकॉर्डवरील तस्करी टोळ्यांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठराखण केल्याप्रकरणी शहर, जिल्ह्यातील 27 पोलिस अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी सांगितले.यापूर्वी वारंवार नोटीस लागू झालेल्या दहा अधिकार्‍यांविरुद्ध विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर शहर, इचलकरंजी, शिरोळ, करवीर, शाहूवाडी विभागातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदारांसह बिट अंमलदारांचा प्रामुख्याने समावेश आहे. येत्या सात दिवसांत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास संबंधितांवर खात्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

काळे धंदे रोखण्यासाठी वारंवार नोटीस बजावूनही आदेशाचे उल्लंघन करणार्‍या जिल्ह्यातील दहा प्रभारी पोलिस अधिकार्‍यांविरुद्धही पावले उचलण्यात येत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे नुकताच अहवाल सादर करण्यात आला आहे. संबंधितांवरील कारवाईबाबत लवकरच निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

शहरासह जिल्ह्यातील काळेधंदे मोडीत काढून तस्करी टोळ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी यापूर्वी पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, काही अपवाद वगळता शहरासह, करवीर, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, कागल, चंदगड, आजरा, गगनबावडा, राधानगरी परिसरात काळ्याधंदेवाल्याचे साम्राज्य दिसून येते. विशेष पथकामार्फत कारवाईसाठी पावले उचलण्यात येत आहे. ही बाब गंभीर आहे, असेही ते म्हणाले.

स्किल गेमच्या नावाखाली तीन पानी जुगार अड्ड्यांच्या माध्यमातून लूटमारीचा प्रकार सुरू आहे. मटकाही तेजीत आहे, असे स्पष्ट करीत पोलिस अधीक्षक मोहिते म्हणाले की, पोलिस दलांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील 27 प्रभारी पोलिस अधिकार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.