Tue, Jun 25, 2019 15:43होमपेज › Kolhapur › ना सिग्‍नलचा अडथळा, ना पोलिसांची भीती

ना सिग्‍नलचा अडथळा, ना पोलिसांची भीती

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 04 2018 11:25PMकोल्हापूर : सागर यादव 

ना सिग्नलचा अडथळा, ना ट्राफिक पोलिसांची भीती... दुचाकी-चारचाकींच्या नंबर प्लेटस्वर भागातील नेत्यांचा फोटो लावून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून फिरणारी अल्पवयीन मुले मोकाटपणे फिरत असल्याचे चित्र आहे. अगदी 10-12 वर्षांची आणि मिसरूड न फुटलेली मुले बेदरकारपणे वाहन चालवत गावातील गर्दीच्या रस्त्यांबरोबरच महामार्गावरील प्रचंड वाहतुकीतून बिनधास्त वाहने चालवत आहेत. त्यांच्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने लोकांना बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. 

शहरीकरणाचे आकर्षण असल्याने ग्रामीण भागातील तरुणांकडून चांगल्या गोष्टींऐवजी केवळ अंधानुकरण अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आवश्यक ज्ञान, शिक्षण, विविध क्षेत्रांतील करिअरसाठी प्रयत्न, अत्याधुनिक साधन-सामूग्रीचा, शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या विकासासाठी जोड, उद्योग-व्यापार-व्यवसाय अशा गोष्टी शिकणे काळाची गरज आहे. मात्र, या गोष्टी शिकण्याऐवजी बहुतांश युवक विविध प्रकारची व्यसने, टोळकी, एन्जॉयमेंटस्चे ग्रुप आणि ईर्ष्येचे राजकारण यात स्वत:ला गुरफटून टाकत आहेत. 

शहरी मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांनाही वेगाचे प्रचंड आकर्षण आहे. यातूनच दुचाकी-चारचाकी यासह स्मार्ट मोबाईल फोन अशा गोष्टींच्या जाळ्यात ही मुले आपसूक सापडत आहेत. आई-वडील शेतात दिवसभर काबाडकष्ट करत असताना दुसरीकडे अनेक मुले शहरी मुलांप्रमाणे टिव्ही-मोबाईल आणि फॅशनच्या नावाखाली विविध व्यसनांच्या आहारी जात आहेत.

पालकांच्या दुर्लक्षामुळे धाडस वाढतेय...

अनेकदा आई-वडिलांंच्या लाडामुळे किंवा दुर्लक्षामुळेही मुलांचे धाडस वाढताना दिसत आहे. काहीही न कळणार्‍या लहान-लहान मुलांना घेऊन, एका दुचाकीवर तिघे-चौघे बसून पूर्वी गावात फिरणारी मुले आता गावाबाहेरील मुख्य महामार्गांवर, राज्यमार्गांवरही ये-जा करत असतात. कानात वारे शिरल्याप्रमाणे ते बेदरकारपणे वाहने चालवत असतात. यामुळे त्यांना पाहणार्‍यांच्या काळजाचा ठोका चुकतो. परिसरातील स्थानिक पोलिसांना असणार्‍या मर्यादा, राजकीय नेत्यांचा दबाव अशा कारणांमुळे हे अल्पवयीन आणि वाहन चालविण्याचा परवाना नसणारे युवक बिनधास्त 
आहेत.