Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Kolhapur › मैदान गाजविणार्‍या खेळाडूंची सुरक्षितता ‘रामभरोसे’

मैदान गाजविणार्‍या खेळाडूंची सुरक्षितता ‘रामभरोसे’

Published On: Apr 07 2018 11:28PM | Last Updated: Apr 07 2018 11:27PMकोल्हापूर : सागर यादव 

कोणत्याही सोयी-सुविधांची अपेक्षा न करता दिवस-रात्र काबाड कष्ट करून मैदान गाजविणार्‍या खेळाडूंची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे. ‘जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या जन्म व कर्मभूमीचे नाव  सर्वदूर पोहोचविणार्‍या खेळाडूंची ही अवस्था मग इतर सर्वसामान्यांबद्दलचा विचारच न केलेला बरा’, अशी हताश भावनेची संतप्त प्रतिक्रिया उपस्थित होत आहे. 

काही दिवसांपूर्वी यात्रेच्या कुस्ती मैदानाकडून परतताना झालेल्या अपघातात अनेक मल्लांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर चार-पाच दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एका होतकरू पैलवानाला आपले प्राणगमवावे लागले. फुटबॉलच्या मैदानावरही अशा दुखापती रोजचीच बाब आहे. अशा अनेक खेळात यापूर्वीही खेळाडूंना विविध प्रकारच्या गंभीर व तत्सम दुखापती झाल्या आहेत, होत आहेत.
 

परदेशात खेळाडूंची विशेष काळजी

वास्तविक खेळाडूंकडे प्राईड (अभिमान) म्हणून पाहिले जाते. आपल्या गाव आणि जिल्ह्याचे नाव राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी तो सक्रिय असतो. यामुळे खेळाडूंची विशेष काळजी घेणे हे स्थानिक प्रशासनासह संबंधित घटकांचे कर्तव्य असते. परदेशात खेळाडू घडविताना अशा गोष्टींना प्राथमिकता दिली जाते. मैदान गाजवून देशाचे नाव करणार्‍या खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांना सरावासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. खेळातील प्रशिक्षकांबरोबरच, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट सारख्या तज्ज्ञ व्यक्‍तींचे स्वतंत्र मार्गदर्शन त्याच्याकरिता उपलब्ध करून दिले जाते. स्पर्धेच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था असते. बाहेरगावी स्पर्धा असेल तर रेल्वे, विमान अशा प्रवासासाठी टी-ए, डी-ए दिला जातो. 

विमा सुरक्षा सारख्याही योजनांचा अभाव

देशाचे नाव गाजविणार्‍या खेळाडूंना आयुर्विमासारख्या सुरक्षा योजना नसल्याचे वास्तव आहे. विविध ठिकाणी स्पर्धा खेळायला जाणारे खेळाडूंना मोठा प्रवास करावा लागतो. प्रत्यक्ष मैदानात खेळ करताना त्यांना अनेकदा दुखापती होतात. काहीवेळा त्या गंभीर स्वरूपाच्याही असतात. त्यावर उपचाराचा खर्चही खेळाडूंना किंवा त्यांच्या पालकांना करावा लागतो. एरव्ही खेळाडूंनी स्पर्धा जिंकली, पदक मिळविले तर त्याची जल्लोषी विजयी मिरवणूक काढली जाते. यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. राजकारणी, लोकप्रतिनिधी गर्दी करतात. मोठ-मोठी अश्‍वासने देतात. मात्र, प्रत्यक्ष खेळाडूंना ज्यावेळी आवश्यक असते त्यावेळी कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याबद्दलच्या संतप्त प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींतून व्यक्‍त होतात. 

Tags : Kolhapur, no, security,  players