Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Kolhapur › विकासकामांना राजकारणाचा वास देऊ नका

विकासकामांना राजकारणाचा वास देऊ नका

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहर आणि जिल्ह्यातील विकासकामे करताना त्यास राजकीय वास देऊ नका, एकोप्याने लोकहित साधू या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले. टाऊन हॉल चौकालगतच्या क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज क्रांती उद्यान सुशोभीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव होते.

निवडणुकीनंतर राजकीय वैरत्व विसरून विकासकामांसाठी एकत्र यावे, असे सांगून ना. पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी) सुरू केले तेव्हा काही जणांना यातून काही तरी मिळत असेल, अशी शंका आली. वास्तविक, हा प्रकल्प राबविणारे सुजय पित्रे हे मोठे व्यावसायिक आहेत. केवळ समाजसेवा या भावनेतून त्यांनी या प्रकल्पाला हात घातला. त्यातून त्यांनी शहर आणि रस्ते कसे सुंदर होऊ शकतात हे दाखवून दिले. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांना सुंदर बनविण्याबरोबरच त्यांनी पोलिस मुख्यालयासमोर कॉमन मॅन साकारला. जुन्या ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण हा एक मुद्दा होता. तो आज क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज क्रांती उद्यान सुशोभीकरणाने पूर्णत्वास आला.

क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांचा इतिहास शालेय पुस्तकात आणण्याबाबत आपण शिक्षणमंत्र्यांशी बोलूच; पण अशा इतिहासांना उजाळा देण्यासाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न करू. चिमासाहेबांसह अनेक ऐतिहासिक वारसास्थळे आणि त्यांच्या आठवणी जपायला हव्यात. चिमासाहेबांच्या नावाचे उद्यान, पुतळा आणि जुना राजवाड्याच्या आवारातील बंडाचा इतिहास नव्याने सविस्तर स्वरूपात आणण्यासाठी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासह सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले.

ना. पाटील म्हणाले, ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ सहलीप्रमाणेच येत्या डिसेंबरमध्ये कोल्हापूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी दुर्लक्षित ऐतिहासिक व पर्यटनस्थळे दाखवण्याचा मोफत उपक्रम आयोजित केला जाणार आहे.

या उद्यानात असणारा जुना कारंजा पूर्णपणे निकामी झाला होता. तो दुरुस्त करून नव्याने कारंज्याचे फवारे उडाले आहेत. कोल्हापूर शहरात हा एकमेव कारंजा सुरू झाला असल्याचे सिटिझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी सांगितले.  प्रारंभी क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेबांचे वंशज वैभवराजे भोसले यांनी स्वागत केले. चिमासाहेबांच्या इतिहासाला उजाळा देण्याची मागणी त्यांनी केली. व्यासपीठावर आमदार अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महापालिका स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेविका मेहेजबीन सुभेदार, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.

Tags : development, politics, chandrkant patil