Wed, Apr 24, 2019 12:02होमपेज › Kolhapur › कारागृह नव्हे सुधारगृह!

कारागृह नव्हे सुधारगृह!

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:52AMकोल्हापूर : दिलीप भिसे

कारागृह म्हणजे चार भिंतींआडचं विश्‍व... सराईत गुन्हेगारांची चालती-बोलती शाळाच जणू... एकमेकांचे उदात्तीकरण, गंभीर कारनाम्यांच्या देवाण-घेवाणी अन् सराईत कृत्याच्या प्रशिक्षणाची कार्यशाळाच... कारागृहाची अशीच काहीशी ओळख प्रचलित आहे. मुळात गुन्हेगार समोर दिसला की, कपाळावर आट्या पडतात.त्यात शिक्षा भोगलेल्यांच्या मनाची काय घालमेल असणार?  समाज घटकच काय, रक्ताची नातीही चार कोस दूर पळतात...

आता ही कारागृहे नुसताच कारावास भोगणारी केंद्रे न ठरता जीवनाला पुनर्दिशा देणारी सुधारगृहे बनू लागली आहेत. उर्वरित आयुष्य स्वत:च्या हिकमतीवर जगण्यासाठी वाटसरू ठरू लागली 
आहेत.

क्षणिक रागातून गुन्हा घडतो... अन् स्वत:च्या आयुष्यासह मागच्या-पुढच्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. सामाजिक उपेक्षांसह कुटुंबीयांच्या सुख-दु:खाचा डोलारा कोसळतो. अगदी जेवणातील मिठाच्या वादातूनही अनेकांचे संसार क्षणार्धात धुळीला मिळाले आहेत. 

क्षुल्लक कारणांतून घडणार्‍या घटनांचे प्रमाण लक्षात घेऊन बंदिजनांचे उर्वरित आयुष्य पुन:श्‍च समाज प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील कारागृहांत प्रयोगशील उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. कळंबा, पुणे, नागपूर, नाशिक, तळोजा कारागृहांत त्याचा प्रभावी अंमल सुरू झाला आहे.

बॉम्बस्फोट, दहशती हल्ला, टोळीयुद्ध, खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारवास भोगणारे शेकडो बंदिजन चार भिंतींआड खितपत पडले आहेत. आकाशाला डोळे लावून कोठडीत दिवस कंठणे हा एकमेव पर्याय असतो. 

क्षणिक राग, लोभातून घडलेल्या कृत्यावरील पश्‍चात्तापापेक्षा कारागृहातील बहुतांशी काळ उद्योग-व्यवसायासह आत्मसात कला-गुणांवर व्यतीत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यातून फौंड्री, सुतार, लोहार, शिवण, विणकाम, यंत्रमाग, शेती, लघु उद्योगांसह उर्वरित आयुष्य कोणावर अवलंबून न राहता स्वत:च्या हिकमतीवर ताट मानेने जगण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची कार्यशाळा सुरू करण्यात आल्याने कळंबा कारागृहात आजन्म कारावास भोगणार्‍या अकराशेपैकी तब्बल साडेपाचशेवर कैदी स्वत:च्या पायावर उद्योग-व्यवसायाचे धडे गिरवू लागले आहेत.