होमपेज › Kolhapur › सांगा, आम्ही शिकवायचे कसे?

सांगा, आम्ही शिकवायचे कसे?

Published On: Jun 18 2018 1:16AM | Last Updated: Jun 17 2018 11:55PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

पहिली व आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण शाळा सुरू झाल्या तरी शिक्षकांना दिलेले नाही. त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम शिकवायचा कसा, अशी विचारणा शिक्षकांकडून होत आहे. 

नवीन शैक्षणिक सत्रास 15 जूनपासून प्रारंभ झाला आहे. यंदा पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकात अध्यापन प्रक्रिया, विषय मांडणी या माहितीबरोबरच शिक्षकांना ऑनलाईन क्यूआर कोडची माहिती समजून घेणे आवश्यक आहे. यावर्षी विद्या प्राधिकरणाने पहिली व आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण 20 जून ते 3 जुलै आणि तालुकास्तरावरील प्रशिक्षण 26 जून ते 6 जुलै या कालावधीत आयोजित केले होते. जिल्ह्यातील पहिली व आठवीच्या सुमारे पाच हजार विषय शिक्षकांना जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेकडून (डाएट) प्रशिक्षण देण्यात येणार होते. परंतु,  विद्या प्राधिकरणाने हे प्रशिक्षण काही तांत्रिक कारणास्तव तात्पुरते स्थगित केले आहे. 

पहिली व आठवीच्या नवीन अभ्यासक्रमात नेमका काय बदल झाला आहे. वाचन, लेखनात विद्यार्थी शंभर टक्के प्रगत होण्यासाठी कोणत्या नवीन पद्धती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याचे प्रशिक्षण शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना देणे गरजेचे आहे. परंतु, अद्याप शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. याचा अध्यापनावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवडाभरात ‘डाएट’ कडून ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे समजते. परंतु, ऑनलाईन प्रशिक्षण एकतर्फी होते. यात कोणतीही चर्चा होत नसून, शंका अनुत्तरित राहत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रशिक्षणासाठी निधीच मिळाला नाही

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला (डाएट) केंद्र सरकारकडून पहिली व आठवीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील 24 लाख रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नाही. यामुळे प्रशिक्षण घेण्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. 

पहिली व आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलेले नाही. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणाचे नियोजन करणे अपेक्षित होते. शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षक संभ्रमात आहेत. ऑनलाईनऐवजी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आनंददायी प्रशिक्षण देण्यात यावे.
- संतोष आयरे, राज्य उपाध्यक्ष, राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ.