Mon, Jul 22, 2019 03:31होमपेज › Kolhapur › पै. ‘विजय’च्या अपघाती मृत्यूने न्यू मोतीबाग तालीम गहिवरली

पै. ‘विजय’च्या अपघाती मृत्यूने न्यू मोतीबाग तालीम गहिवरली

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:16AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

मैदान मारून त्याने आपल्या भाऊ आणि वडिलांना विजयाची गोड बातमी दिली. कडेगाव एस.टी. स्टँड येथे आल्यावर फोन करतो, असे सांगून त्याने फोन ठेवला.कुस्तीत ‘विजय’ मिळविणार्‍या विजयला अपघाताने मात्र गाठले.कुस्तीचं मैदान आणि तिथे कोल्हापूरच्या तालमीतील मल्ल नाही, असे होतच नाही. कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कुस्ती संकुलातील मैदानात कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल विजय शिवाजी शिंदे हा सहभागी झाला होता. 93 किलो वजनी गटात त्याने प्रतिस्पर्धी मल्लाचा पराभव करून कुस्ती जिंकली; पण परतीच्या प्रवासात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. चटका लावणार्‍या त्याच्या या मृत्यूमुळे न्यू मोतीबाग तालीम शोकसागरात बुडाली. 

विजय हा मूळचा रामपूर (ता.कडेगाव) गावचा आहे. सन 2007 मध्ये कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी तो येथील न्यू मोतीबाग तालमीमध्ये आला. नियमित कुस्तीचा सराव आणि चपळता यामध्ये अल्पावधित विजयने कुस्तीमध्ये नाव कमविले. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या अनेक चाचण्यांमध्ये तो सहभागी झाला; पण तो अपयशी ठरला. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेची त्याची जिद्द मात्र कायम होती. त्यासाठी त्याची धडपडही सुरू होती.

महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या मैदानांतही तो कुस्ती करत असे. तीन दिवसांपूर्वी गावाकडून विजयला फोन आला. कुंडलला कुस्ती मैदान असून, तू ये. त्यामुळे विजय गावाकडे गेला. गावातील पैलवानांबरोबर तो या कुस्ती स्पर्धेत सहभाग होऊन त्याने हे मैदान मारले. 

विजयची घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्याच्या घराण्याला कुस्तीचं वेड असून, वडील कुस्ती शैकीन आहेत. महिन्याला ते कोल्हापूरला तूप, खारका, बदाम यासह सुकामेवा घेऊन विजयला भेटण्यासाठी न्यू मोतीबाग तालमीमध्ये येत होते. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उपमहाराष्ट्र केसरी नंदकुमार अबदार यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत होता. 
पैलवान विजयच्या मृत्यूची बातमी समजताच कुस्ती क्षेत्रासह न्यू मोतीबाग तालीम शोकसागरात बुडाली. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच तालमीतील मल्ल हताश होऊन बसले होते.