Mon, Apr 22, 2019 02:26होमपेज › Kolhapur › 500 कोटींची बांधकामे ठप्प

500 कोटींची बांधकामे ठप्प

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:40AMकोल्हापूर : सतीश सरीकर

घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण न आखल्याने राज्यातील सर्व शहरांतील नव्या बांधकामांना सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी स्थगिती दिली आहे. कोल्हापूर शहरातील सुमारे 250 च्यावर अपार्टमेंट, कमर्शियल कॉम्प्लेक्स आदींच्या बांधकामांवर त्याचा परिणाम झाला आहे. यात ‘रेरा’ कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या 176 बांधकामांचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील तब्बल पाचशे कोटींची गुंतवणूक असलेली बांधकामे ठप्प झाली आहेत.

कोल्हापूर शहरात ‘क्रेडाई’चे दीडशेच्यावर सभासद आहेत. आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनचे सुमारे चारशे, इंजिनिअर्स असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आदी मिळून सुमारे सातशेच्यावर बांधकाम व्यावसायिक कोल्हापुरात आहेत. शहरात सुमारे दोन हजारांवर फ्लॅटचे काम सुरू आहे. कोल्हापूर महापालिकेला बांधकाम व्यावसायिकांकडून वर्षाला सुमारे 70 ते 75 कोटींचे उत्पन्‍न मिळते. त्यावरूनच शहरातील बांधकाम व्यवसायाचे गणित स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचा या सर्व व्यवासायिकांवर परिणाम होणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचीस्थिती विदारक

कोल्हापूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेतली असता फारच विदारक स्थिती असल्याचे दिसून येते. शहरात दररोज सुमारे 180 टन कचरा निर्माण होतो. परंतु, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सद्यस्थितीत कोल्हापूर महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. महापालिकेच्या वतीने पुण्यातील रोकेम कंपनीला कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्यासाठीचा ठेका देण्यात आलेला आहे. सुमारे पंधरा कोटींचा हा प्रकल्प पाच वर्षे झाली, तरीही सुरू झालेला नाही. रोज निर्माण होणारा कचरा अद्यापही लाईन बझारमधील झूम कचरा प्रकल्पावरच टाकला जात आहे. परिणामी, झूमवर सुमारे पाच लाख टन कचर्‍याचा डोंगर झाला आहे.

दरम्यान, शहरात दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीच्या 37 कोटी 17 लाखांच्या आराखड्याला (डीपीआर) मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील अत्यंत गंभीर बनलेल्या कचर्‍याचा प्रश्‍न कायमचा मिटण्याची शक्यता आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेला हा निधी मिळणार आहे. आराखड्यांतर्गत 104 टिपरसह इतर वाहने घेणे, झूमवर कचरा कॅप करणे, झूममध्ये अंतर्गत रस्ते करणे, झूममध्ये गटर, स्ट्रॉर्म वॉटर, झूममध्ये लिचेड ट्रीटमेंट प्लँट, ओला कचरा प्लँटसाठी मशिनरी, ओला कचरा प्रक्रिया शेड, सुका कचरा शेड आदींसह इतर कामे केली जाणार आहेत.